खननामुळे आंतरराज्यीय पुलाला धोकातुमसर-कटंगी मार्ग : वैनगंगा नदीवरील पुल, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: August 3, 2016 12:27 AM2016-08-03T00:27:04+5:302016-08-03T00:27:04+5:30
रेती खननामुळे तुमसर-कटंगी आंतरराज्यीय पुलाला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तुमसर-कटंगी मार्ग : वैनगंगा नदीवरील पुल, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
मोहन भोयर तुमसर
रेती खननामुळे तुमसर-कटंगी आंतरराज्यीय पुलाला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातील महकेपार बाम्हणी मार्गावर रेती खननामुळे पुलाला यापूर्वी तडे गेले आहे. तशीच पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुमसर - कटंगी आंतरराज्यीय मार्गावर नाकाडोंगरी व बोनकट्टा दरम्यान वैनगंगा नदीवर पूल आहे. पुलाची लांबी मोठी आहे. पुलांच्या खांबाजवळील परिसरातील रेतीचा उपसा प्रचंड प्रमाणात करण्यात आला. त्यामुळे पुलाच्या खांबाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. ही रेती मॉईल प्रशासन नेत असल्याची माहिती आहे. चिखला येथे मॅग्नीजची भूमीगत खाण आहे. मॅग्नीज काढल्यावर रिकाम्या पोकळीत रेती भरल्या जाते. सुमारे ३० ते ३५ वर्षाकरिता खाण प्रशासनाला भाडे तत्वावर रेती खनन करण्याची परवानगी राज्य शासनाच्या महसूल विभागाने दिली आहे.
केंद्र शासनाच्या खाणीत ही रेती नेत असल्याने राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. पूर्व विदर्भातून बालाघाट येथे हाच मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावर मोठी रहदारी आहे.
महाराष्ट्राच्या सीमेतून रेती उपसा केली जाते. मोठ्या प्रमाणात येथे रेती उपसा सुरु आहे. किमान पुलाच्या खांबाजवळून रेती उपस्यास बंदी करण्याची गरज आहे. रेती उत्खननाचे नियम आहेत. त्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
महकेपार - बाम्हणी मार्गावर रेती खननामुळे एका पुलाला तडे गेल्याने मध्यप्रदेश शासनाने पुलावरून वाहतूक बंद केली आहे. त्या पुलाची पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेशुमार रेती उपस्यावर नियमानुसार महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाईची गरज आहे. वैनगंगा नदीत सध्या पाणी आहे.
नदीच्या प्रवाहामुळे नवीन रेती येण्याची शक्यता जास्त आहे. किती प्रमाणात रेती वाहून येते त्यावर त्या पुलाचे भविष्य निर्भर आहे. शासनाने ही बाब गंभीरतेने घेण्याची नक्कीच गरजेचे आहे. पाण्याचा जोरदार प्रवाहाचा परिणाम पुलावर तांत्रिकदृष्ट्या जास्त होता. रेतीमुळे पुलाचे संरक्षण होते हे विशेष. पुल परिसरातून किमान ५० ते ७० मिटर अंतरापर्यंत रेती खननाला बंदी घालण्याची आवश्यकता आहे.
वैनगंगा नदीत पाणी आहे. त्यामुळे पुलाखालील खांबाजवळील रेतीचा अंदाज घेणे शक्य नाही. मॉईल प्रशासनाने तिथून रेतीचा उपसा केला असेल तर त्यांना महसूल विभाग रितसर पत्र देऊन माहिती मागेल. नदीच्या प्रवाहासोबत रेती येण्याची शक्यता निश्चितच आहे. यापुढे पुलाजवळ रेती उत्खननास बंदी केली जाईल.
-एन.पी.गौंड, नायब तहसीलदार तुमसर