मुरुम खननामुळे कोसरा वितरिकेला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:37 PM2017-12-03T22:37:21+5:302017-12-03T22:39:53+5:30
नेरला उपसा सिंचन योजनेच्या कोसरा वितरिका असलेल्या कालव्यालगत मुरुमाचे अवैध खनन केल्याने वितरिका सुरु होण्याच्या अगोदर तिला तडे जाऊ शकतात. हा प्रकार चुऱ्हाड (कोसरा) येथे राज्य मार्गालगत घडत आहे.
आॅनलाईन लोकमत
कोंढा-कोसरा : नेरला उपसा सिंचन योजनेच्या कोसरा वितरिका असलेल्या कालव्यालगत मुरुमाचे अवैध खनन केल्याने वितरिका सुरु होण्याच्या अगोदर तिला तडे जाऊ शकतात. हा प्रकार चुऱ्हाड (कोसरा) येथे राज्य मार्गालगत घडत आहे. मुरुम खनन करणाऱ्यांनी वितरिकेचा देखील विचार न केल्याने कोसरा वितरिकेला धोका निर्माण झाला आहे.
शासनाच्या उदासीन धोरणामुळे नेरला उपसा सिंचन योजना सध्या बंद आहे. या योजनेस निधी अत्यल्प उपलब्ध होत असल्याने वितरिकेचे काम बंद आहे सोनेगाव (फाटा) जवळून कोसरा वितरिका तयार होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या.
कोसरा वितरिकेच्या कालव्यालगत चुऱ्हाड (कोसरा) येथे कंत्राटदार व इतर लोकांनी मुरुमाचे अवैध उत्खनन होत असल्याने मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे या वितरिकेला धोका निर्माण झाला आहे. चुऱ्हाड हे अड्याळ कोंढा या मार्गावर असलेले जवळपास ३०० लोकवस्तीचे गाव आहे. राज्यमार्गावर असलेल्या गावालगत भरपूर सरकारी जागा आहे. या जागेत दिवसरात्र उत्खनन करुन मोठमोठे तलाव, बोळी निर्माण केली
मुरुम खनन करणाऱ्यांनी जेसीबी मशिनद्वारे अगदी कोसरा वितरिकेला लागून खनन केले असून मोठे खड्डे निर्माण केले आहे. पण यासर्व प्रकाराकडे विदर्भ पाटबंधारे विभाग आंबाडी येथील अधिकारी, अभियंता यांचे दुर्लक्ष होत आहे.
भंडारा पवनी राज्यमार्गाने महसूल विभागाचे तहसीलदार, पवनी, राजस्व निरीक्षक, तलाठी कर्मचारी येणे-जाणे करतात. पण त्यांना चुऱ्हाड येथे अवैध उत्खननातून मोठे खड्डे पडलेले दिसत नाही. सध्या महसुल विभागाकडून मुरुम उत्खननाची परवानगी घ्यायची त्यानंतर हजारो ब्रास मुरुम उत्खनन करायचे हा प्रकार राजरोसपणे सुरु आहे.
अवैध मुरुम उत्खननाचा अड्डा चुऱ्हाड राज्यमार्गालगत गट ग्रामपंचायत कोसरा अंतर्गत चुऱ्हाड ये गाव येते. या गावाच्या आजूबाजूला भरपूर सरकारी जागा आहे. वनविभागाची नर्सरी व जागृत हनुमंतांचे मंदिर असलेल्या भागात रात्रीच्या सुमारास जेसीबीद्वारे खनन केले जाते, पण कोणीही याकडे लक्ष देत नाही. कोंढा येथील एका संस्थापकाने सरकारी जागेला लागून अर्धा एकर जागा घेतली. तेथून केव्हाही मुरुम खनन केले जाते. या खननामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात आहे.
दुसरीकडे पर्यावरणाला धोका पोहचत आहे. मुरुम उत्खनन करणाऱ्या लोकांनी कालवा देखील सोडला नाही. मुरुम खननाची योग्य चौकशी जिल्हाधिकाºयांनी करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.