रेल्वे उड्डान पूल ठरतोय कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:52 PM2018-03-17T22:52:21+5:302018-03-17T22:52:21+5:30
तुमसर रोड (देव्हाडी) येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे, उड्डाण पुलाअंतर्गत अंडरपास, सब-वे हे कमी उंचीचे व सदोष बांधण्यात आल्याने ते ठिकाण अपघातग्रस्त स्थळाचे बनणार आहे.
राहुल भुतांगे ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे, उड्डाण पुलाअंतर्गत अंडरपास, सब-वे हे कमी उंचीचे व सदोष बांधण्यात आल्याने ते ठिकाण अपघातग्रस्त स्थळाचे बनणार आहे. परिणामी अनेकांना जीव गमवावा लागणार असल्याने रेल्वेचा तो उड्डाणपुल देव्हाडीवासीयांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे.
दिल्ली, मुंबई-बिलासपूर अशा एक नव्हे तर अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे या तुमसर (रोड) देव्हाडी जंक्शन वरून दररोज १५० च्या घरात रेल्वे धावतात. त्यामुळे चारचाकी वाहनचालकांना रेल्वे क्रॉसिंगवर, तासन्तास ताटकळत राहावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलासाठी तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने रेल्वे उड्डाणपुलाला ५० टक्के निधी रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारने देण्याचे मान्य करून मंजुरी दिली. त्यानंतर या कामाला सुरूवात झाली. त्यामुळे आता पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. मात्र उड्डानपुलाच्या सदोष बांधकामामुळे देव्हाडीवासीयांसाठी तो पुल त्रासदायक व धोकादायक ठरणार आहे. कारण त्या उड्डानपुलातंर्गत कमी उंचीचे अंडरपास सब-वे तयार करण्यात आले. ज्या पद्धतीने रेल्वे उड्डानपुलाचा बांधकाम होत आहे. त्यानुसार देव्हाडी (तुमसर रोड) येथे जाण्याकरिता कोणतीही बस तिथे थांबणार नाही. बस थांब्याकरिता जागा नाही.
एसटी थांबवायचे झाल्यास तिला गावाबाहेर एक ते दीड किलोमीटर अंतरावर थांबावे लागणार आहे.
तुमसर रोड रेल्वे स्थानिक हे मोठे रेल्वे जंक्शन असल्यामुळे दररोज येथे हजारो प्रवाशी कटंगी, तिरोडी, खैरलांजी, वाराशिवनी, तिरोडा, तुमसर, साकोली, मोहाडी या ठिकाणाहून येतात. रात्री अपरात्री रेल्वे येत असल्यामुळे देव्हाडी गावात वाहनांची वर्दळ असते. त्यात तुमसर-रामटेककडे जाणारा अंडरपास (सब-वे) व गोंदियाकडे जाणारा अंडरपास हा कमी उंचीचा असून त्या ठिकाणाहून जडवाहने टर्न होऊ शकत नाही. त्याठिकाणी अपघात होऊन जनतेला नाहक त्रासाला सामोरे जाण्याची चिंता सतावू लागल्यामुळे देव्हाडी ग्रामपंचायतने ठराव घेऊन रेल्वे व राज्य सरकारला पुलाच्या विस्तारीकरणासाठी विनंती केली. परंतु अद्यापही त्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ता खुशाल नागपुरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.