वाढत्या तापमानामुळे पशु-पक्ष्यांच्या जीवाची काहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:18 PM2019-05-13T23:18:41+5:302019-05-13T23:19:03+5:30
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले चिमणी, कावळे, कबूतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले चिमणी, कावळे, कबूतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्था यामुळे भंडाराकर त्रस्त झाला आहे. या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेताना दिसत आहे. मात्र, वाढत्या उष्माने त्रस्त पशू-पक्षांचे काय? असा प्रश्न साहजिकच मनात येतो. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता भंडाराकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसांप्रमाणे पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. उन्हाळ्यात माणासाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्त्राव होतो, तर काहींना हीटस्ट्रोकही येतो. माणसांत दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशू-पक्षी सावलीत बसतात. मात्र, सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्मापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्माचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्माचा मोठा फटका बसतो.
पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो. तसेच हीटस्ट्रोक होतो. भोवळ येऊन ते पडतात, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर वनविभागान व वन्यप्रेमी मदतीसाठी पुढाकार घेतील काय? असा प्रश्न आता विचारला जावू लागला आहे.
हिरवळीचा अभाव
उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात. मात्र, अलीकडे हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे. अशी खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात. ज्यांच्या घरी पाळीव जनावरे आहेत, अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणादरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य, असा आहार द्यावा.
अशी घ्या काळजी
घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळ घरातील चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेऊन गेले की, ते अस्वस्थ होतात. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी घेऊन जावे. पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.