यादी मराठीत पाठविल्याने भंडारा जिल्ह्यात रखडला चार कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 10:18 PM2020-11-26T22:18:52+5:302020-11-26T22:19:18+5:30
Bhandara News farmer अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची यादी महसूल प्रशासनाने मराठीत पाठविल्याने तुमसर तालुक्यातील तब्बल चार कोटी रुपयांचा निधी रखडल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची यादी महसूल प्रशासनाने मराठीत पाठविल्याने तुमसर तालुक्यातील तब्बल चार कोटी रुपयांचा निधी रखडल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रीयकृत बँकांना इंग्रजीतून यादी हवी असल्याने अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम वळती झाली नाही. दुसरीकडे महसूल प्रशासनाने बँकेशी यासंदर्भात संपर्क साधला नाही. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने रोष व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात तुमसर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. नदीकाठावरील गावा महापूर आला होता. यात शेतकऱ्यांचे धान पिकाचे व फळभाजी लागवडीचे मोठे नुकसान झाले होते. लोकप्रतिनिधींनी सदर नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. शासनाने त्यानंतर अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदतीची घोषणा केली. महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण केले. या यादीला शासनाकडून मान्यता मिळाली. दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मिळेल असे सांगण्यात आले. परंतु दिवाळी लोटून पंधरा दिवस झाले, तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोचली नाही.
महसूल प्रशासनाने राष्ट्रीयकृत बँकेत मराठीमध्ये लाभार्थ्यांची यादी पाठवली. बँकेने इंग्रजीत यादी पाहिजे असे लाभार्थ्यांना सांगितले. काही लाभार्थ्यांनी महसूल प्रशासनाचे संपर्क साधून याची माहिती दिली. परंतु अद्यापही महसूल प्रशासनाकडून येथे दखल घेण्यात आले नाही अशी तक्रार पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.
खरीप हंगाम अतिवृष्टी मध्ये वाहून गेला कसेबसे काही शेतकऱ्यांनी यातूनही मार्ग काढला नदी काठावरील गावातील शेतकरी मात्र अद्यापही वाऱ्यावर आहे. रब्बी पिकांच्या हंगाम सुरू झाला आहे. याकरिता अतिवृष्टी दरात शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. परंतु ती गरज अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. बँकेकडे मराठीत यादी पाठवली परंतु अतिवृष्टी धारकांच्या खात्यात निधी वळता झाला नाही. त्यामुळे शेतकरी बँकेकडे व महसूल प्रशासनाकडे वारंवार जाऊन भेट देत आहेत. परंतु यावर अजूनही तोडगा निघालेला नाही.
महसूल प्रशासनाने बँकेकडे मराठीत लाभार्थ्यांची यादी पाठवली ती यादी इंग्रजीत पाहिजे असे बँकेकडून सांगण्यात येत आहे येथे महसूल प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन इंग्रजीत यादी पाठविण्याची गरज आहे या दप्तर दिरंगाई यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे.
-हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य, तुमसर.