अवकाळी पावसाचा रबीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:01 PM2018-12-09T22:01:07+5:302018-12-09T22:02:11+5:30
जिल्ह्यात दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर यासह मोहाडी, तुमसर तालुक्यातील सकाही भागात पावसाच्या सरी बरसल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: जिल्ह्यात दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर यासह मोहाडी, तुमसर तालुक्यातील सकाही भागात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे धानासह रबी पिकाला चांगलाच फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.
रबी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा, वाटाणा, गहू, ज्वारी, मुग, उडीद, मटकी, लाख-लाखोरी, जवस, मिरची, कोथिंबीर व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. भंडारा शहरात सकाळी ९ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने भाजीविक्रेत्यांची एकच धांदल उडाली.
पवनी : मागील काही दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सुर्याचे दर्शन झाले नाही. पवनी शहरात पाऊस बरसला नाही. धानाची मळणी काहींची झाली, काहींची व्हायला आहे. अशा वातावरणात रब्बी हंगामातील पिकावर अळी पडते असा शेतकऱ्यांना अनुभव आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. रबी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा, वाटाणा, गहू, ज्वारी, मुग, उडीद, मटकी, लाख-लाखोरी, जवस, मिरची, कोथिंबीर व भाजीपाला अशी पीकं घेतली जातात. अशा सर्व पिकांचे अळी पडल्याने नुकसान होत असते. सकाळ पासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी वर्गाला चिंता सतावत आहे.
साकोली : मागील दोन तीन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून कडाक्याची थंडी आहे. मात्र आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून हलका पाऊस आला. याचा फरक आज आठवडी बाजारावर पडला आहे. शेतात कठाण माल असून या पावसाचा तेवढा परिणाम पडला नसला तरी ढगाळ वातावरणामुळे नक्कीच फरक पडणार आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकºयांचे धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे. जर जोराचा पाऊस आला तर धान नसविण्याची होण्याची शक्यता आहे.
जवाहरनगर : सतत तीन दिवसापासून जवाहरनगर व इतर परिसरात ढगाळ वातावरण होते. सूर्याचे दर्शनही झाले नाही. आज सकाळी ८.३० वाजता सुमारापासून ११ वाजतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली.यामुळे शेतकऱ्यांचे शेतावर कापलेले धान पिकास नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पालांदूर : दहा दिवसांपासून ढगाळ हवामानाने मानवी जीवनासह बागायती कडधान्याची शेती प्रभावित झाली आहे. रविवार सकाळपासूनच आभाळ ढगांनी भरून आले. मोठा पाऊस येणार अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली. मात्र परिसरात तुतळक पावसाची हजेरी लागली. तुळीच्या शेंगा पोखरणारे पोषक हवामान असल्याने तूर पीकाचे नुकसान झाले आहे. उघड्यावर धान खरेदी केंद्रावर धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. मिळेल ती साधने वापरीत धान झाकण्याचा प्रयत्न शेतकरी करीत होते. मोठा पाऊस आल्याशिवाय आभाळ खुलणार नाही, असे जाणकारांचे म्हणने आहे.