उन्हामुळे मापाऱ्यांनी शेतमालाचे वजनमाप करणे नाकारले

By admin | Published: April 13, 2017 12:25 AM2017-04-13T00:25:14+5:302017-04-13T00:25:14+5:30

तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या वजनमापाकरिता (काटा) ताटकळत सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

Due to the sun, the tappers refused to weigh the field | उन्हामुळे मापाऱ्यांनी शेतमालाचे वजनमाप करणे नाकारले

उन्हामुळे मापाऱ्यांनी शेतमालाचे वजनमाप करणे नाकारले

Next

हिरव्या नेटची मागणी : तुमसर बाजार समितीमधील प्रकार
तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या वजनमापाकरिता (काटा) ताटकळत सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. बुधवारी व्यापाऱ्यांनी शेतमालाची बोली केली, परंतु मापाऱ्यांनी शेतमालाचे वजनमाप केले नाही. भर उन्हात वजनमाप कसे करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना नियोजनाचा येथे फटका बसत आहे.
तुमसर - मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीमंत बाजार समिती म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. बाजार समितीचे मार्केट यार्ड प्रशस्त आहे. परंतु शेतमालाची आवक येथे मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. बुधवारी व्यापाऱ्यांनी धान, तुर, लाखोरी सह इतर धान्यांची बोली केली. बोलीनंतर वजनमापे करण्यात येतात. परंतु मापाऱ्यांनी भर उन्हात वजनमापे न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना दिवसभर बाजार समिती मार्केट यार्डात ताटकळत उभे राहावे लागले.
या संदर्भात काही शेतकऱ्यांनी याबाबत मापाऱ्यांना विचारले असता बाजार समिती प्रशासनाला उन्हापासून बचावाकरिता हिरवी नेट तात्पुरती लावण्याचे निवेदन दिले होते. परंतु त्याकडे बाजार समिती प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे सांगितले. बुधवारी दिवसभर तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना उपाशी सायंकाळपर्यंत वजनमाप करण्याकरिता येथे प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळपर्यंत हा तिढा सुटला नव्हता. श्रीमंत व कोट्यवधींची उलाढाल करणारी बाजार समिती शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्याचा दावा करते.
उन्हापासून संरक्षण करण्याकरिता सुविधा उपलब्ध करण्यात असमर्थ ठरल्याचा आरोप हरदोली (झंझाड) येथील शेतकरी सेवक झंझाड यांनी केला आहे. मापाऱ्यांनी हिरवी नेट लावल्याचे निवेदन दिलेले नाही. अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना दिली. याप्रकरणी समिती सचिवांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to the sun, the tappers refused to weigh the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.