भोवळ आली, पडले अन् गेला जीव !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 04:24 PM2024-05-31T16:24:03+5:302024-05-31T16:24:31+5:30
Bhandara : १० दिवसात ६ जणांचा आकस्मिक मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अचानकपणे भोवळ आल्याने पडल्यावर काही कालावधीनंतर मृत्यू होण्याच्या ६ घटना मागील १० दिवसात जिल्ह्यात घडल्या आहेत. सध्या नवतपा सुरू असून, तापमान ४५ ते ४६वर पोहचले आहे. हे मृत्यू उष्माघाताचे की, अन्य कशामुळे झाले, याबद्दल आरोग्य विभागाने स्पष्ट केले नसले तरी उष्णतामान वाढल्यानेच या घटना घडल्याचा अंदाज लावला जात आहे.
या सर्व घटनांमधील पार्श्वभूमी अगदी समान आहे. बहुतेक घटना दुपारच्या सुमारास घडल्या आहेत. भोवळ येणे हे त्यातील प्रमुख कारण आहे. जिल्ह्यात आठवड्यापासून तापमान वेगाने वाढले आहे. रात्रीच्या तापमानातही वाढ झाली असून, ते ३७ ते ३८ राहात आहे. कामानिमित्त तसेच शेतावर शेतकऱ्यांना जावेच लागले. कडक उन्हाचा प्रकोप सहन न झाल्याने अनेकांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या तक्रारी डॉक्टरांकडे वाढल्या आहेत.
गुराख्याचा उपचारादरम्यान मृत्यू
लाखांदूर: शेत शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेला गुराखी उष्णतेने भोवळ येऊन जमिनीवर पडला. या घटनेची माहिती रात्री उशिरा गुराख्याच्या कुटुंबीयांसह नागरिकांना लक्षात आली. त्यानंतर शेतावर पोहचून उपचारासाठी त्याला लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिकच गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता दोन दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भाष्कर तरारे (५२) असे या गुराख्याचे नाव असून, ही घटना ३० मे रोजी मांढळ येथे घडली.
२८ मे रोजी भाष्कर तरारे दुपारच्या सुमारास पाळीव जनावरे घेऊन चराईसाठी गावालगतच्या शेतशिवारात गेला होता. दुपारी जनावरे चरत असताना शेतशिवारात उभा असताना भोवळ आली. त्यामुळे तो जमिनीवर पडला. सोबत कोणीच नसल्याने ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. तो तसाच पडून राहिला. सायंकाळ झाल्यावर जनावरे स्वतःहून गावाकडे परतून घरीही पोहचली. मात्र, उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी शेतशिवारावर शोध घेतला असता शेतशिवारात बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिकच गंभीर असल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ३० मेच्या दुपारी मृत्यू झाला.
...हे आहेत संभाव्य उष्माघाताचे ६ बळी
• पहिल्या घटनेत लाखांदूर येथील इश्वर नारायण लोहारे या ६० वर्षीय शेतकऱ्याचा २० मे रोजीच्या दुपारी शेतामधून घरी परत येताना भोवळ आल्याने मृत्यू झाला होता. कापलेले धान जमा करून ते गावाकडे येताना ही घटना घडली.
• पवनी तालुक्यातील पिपळगाव येथील शेतकरी चंद्रशेखर बाबूराव जीपकाटे (४७) हे २० मेच्या सकाळी आपल्या घरीच खुर्चीवरून उठताना भोवळ येऊन पडले व त्यानंतर मृत झाले होते.
• २६ मेच्या दुपारी जनावरे विकून ब्रह्मपुरीहून मेटॅडोरमधून परत येताना लाखांदूर येथील संतोष विठ्ठल नहाले (४०) यांचा भोवळ आल्याने मृत्यू झाला होता. ही घटना प्रवासादरम्यान घडली होती.
• २६ मे रोजी मौदा येथील श्यामराव बकाराम चाचेरे या व्यक्तीचा भंडारा शहरातील बाजारात भोवळ येऊन मृत्यू झाला होता. झालेल्या या आकस्मिक मृत्यूची दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. वाढत्या उष्णतेमुळे हे घडण्याची शक्यता असल्याने उष्माघाताचे मृत्यू असे म्हणता येईल. या संदर्भात शासकीय स्तरावरुन मदतीचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहे.
• २९ मेच्या दुपारी आपल्या घराजवळच्या अंगणाचे मोजमाप करताना सोनी (ता. लाखांदूर) या गावातील गोपाळा डाकू वसाके या ८३ वर्षीय वृद्धाचा भोवळ येऊन मृत्यू झाला होता.
• ३० मे रोजी भाष्कर तरारे या ५२ वर्षीय मांडळ (ता. लाखांदूर) येथील गुराख्याचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २८ मेच्या दुपारी गुरे चारताना तो भोवळ येऊन पडला होता. दोन दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तो सहावा बळी ठरला आहे.
"झालेल्या या आकस्मिक मृत्यूची दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. वाढत्या उष्णतेमुळे हे घडण्याची शक्यता असल्याने उष्माघाताचे मृत्यू असे म्हणता येईल. या संदर्भात शासकीय स्तरावरुन मदतीचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहे."
- डॉ. मिलींद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा