स्वत:च्या अंगावर फाटकी बनियन, पण उसनवारी करून ‘सर्जा-राजा’चा साज श्रृंगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 02:57 PM2022-08-25T14:57:14+5:302022-08-25T15:02:38+5:30
पोळ्यावर अतिवृष्टीचे सावट : सजावटीचे साहित्य २० टक्क्यांनी महागले
मुखरू बागडे
भंडारा : श्रमाचा गौरव करणारा सण म्हणजे पोळा. वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या सर्जा-राजाला सजवून पोळ्याच्या दिवशी त्याची सांग्रसंगीत पूजा केली जाते. मात्र, यंदा अतिवृष्टी आणि महागाईचे सावट पोळ्यावर दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पोळा सण साजरा करण्यासाठी उधार उसनवार करण्याची वेळ आली आहे.
पोळा हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण. या सणाला आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सजविले जाते. त्यासाठी बाजारातून झुलीसह विविध साहित्य विकत आणले जाते. परंतु, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा फटका बसला. धान पीक धोक्यात आले. त्यातच बाजारातही २० टक्क्यांपर्यंत सजावटीचे साहित्य महाग झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पोळा सणाला हात आखडता घ्यावा लागण्याची शक्यता आहे.
- झुल, वेसण, कासरे, घुंगरमाळा, बाशिंग, वार्निश, आदींच्या किमती जवळपास २० टक्क्यांनी वाढल्याचे बाजारात दिसते.
- सजावट करण्यासाठी एका जोडीला पाच हजार रुपये खर्च येतो. परंतु, महागाईने शेतकरी केवळ १००० ते १५०० रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहे.
सावकाराशिवाय पर्याय काय?
रब्बी हंगामातील धानाचे पैसे अद्याप मिळायचे आहेत. अनेकांच्या घरात तर धान पडून आहे. त्यामुळे पोळा सणासाठी उधार-उसनवार करावी लागेल किंवा सावकाराच्या दारात गेल्याशिवाय पर्याय नाही.
बैल-बारदाना परवडेना
बैलांच्या किमती आणि वर्षभर वैरण, आदींचा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे शेतकरी आता बैलांऐवजी यांत्रिक पद्धतीने शेती करीत आहे.
म्हणून वाढले भाव
दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत आहे. ट्रॅक्टर वाढत आहेत. दरवर्षी सजावटीच्या साहित्याची किंमत वाढत आहे. सर्वच वस्तूच्या किमती वाढल्याने यंदा पोळ्याच्या सजावट साहित्यातही वाढ झाल्याचे दिसत आहे. महागाईने आमचा नफाही कमी झाला आहे.
- रामचंद्र खेडीकर, व्यापारी
सर्वसामान्य शेतकरी काय म्हणतात..
यथाशक्ती खर्च करून पोळा तर साजरा करावाच लागेल. वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाला, तसेच कसे ठेवणार?
- छगन गोटेफोडे, पालांदूर
यांत्रिक जमाना आला तरी बैलजोडीशिवाय पर्याय नाही. पोळ्याचा आनंद वेगळा असतो. आम्ही सर्जा-राजाला सजविणार आहोत.
- पुरुषोत्तम नंदनवार, शेतकरी