दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे हाल ; भंडारा बनले खड्डेमय शहर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:04 PM2024-07-22T12:04:35+5:302024-07-22T12:08:39+5:30
डांबर उखडले : लाखो रुपयांची उधळपट्टी गेली पाण्यात, भुर्दंड कुणाला?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील खड्ड्यांचा विषय नवीन नसला तरी गत दोन दिवसांपासून आलेल्या दमदार पावसामुळे भंडाऱ्यातील रस्त्यांचे बेहाल झाले आहे. एकीकडे कोट्यवधींचा निधी आणून सिमेंट रस्ते बनविण्याचा सपाटा सुरू असताना डांबरी रस्ते मात्र पावसामुळे उखडले आहेत.
भंडारा शहराची लोकसंख्या लक्षात घेता, वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराचा जसजसा विस्तार वाढत गेला, तसतशी रस्त्यांचीही संख्या वाढत गेली. आजही भंडारा शहराला लागून असलेल्या आऊटर कॉलनीमधील रस्त्यांची दैनावस्था आहे. म्हाडा नगर असो की तकिया वॉर्ड परिसरातील भाग, येथे कच्चे रस्ते हमखासपणे दिसतात.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात आल्यावर हे मुख्यालय आहे की खड्डेमय शहर, असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. पंधरवड्यापूर्वी मुस्लिम लायब्ररी चौक ते कॉलेज मार्गापर्यंतचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, २०० मीटर हाकेच्या अंतरावर असलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकातील खड्डे मात्र स्थानिक प्रशासनाला दिसले नाहीत. ते खड्डे जीवघेणे होते म्हणूनच डागडुजी करण्यात आली, असा युक्तिवाद सुद्धा चांगलाच रंगला होता. रस्त्यावरील राजकारण रंगले असतानाच शुक्रवारी रात्रीपासून आलेल्या दमदार पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची पुन्हा पोलखोल केली.
दीड वर्षात उखडला रस्ता
जिल्हा सामान्य रुग्णालय ते ग्रामसेवक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे दीड वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले होते. जवळपास ६० लाख रुपये या रस्त्यावर खर्च झाले होते. मात्र, दीड वर्षातच या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. अशीच अवस्था अन्य रस्त्यांचीही आहे. शहरात चांगल्या सिमेंटच्या रस्त्यावर पुन्हा सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. तर दुसरीकडे उखडलेल्या डांबरी रस्त्यांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सदर रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही, असे बोलून चेंडू टोलविला जात आहे.
या रस्त्यांची स्थिती दयनीय
भंडारा शहरातील अत्यंत रहदारीचा असलेल्या मिस्किन टैंक ते महात्मा गांधी चौक रस्ता, जिल्हा सामान्य रुग्णालय चौक ते ग्रामसेवक कॉलनीकडे जाणारा रस्ता, बीटीबीसमोरील मार्ग, संताजी कार्यालय ते खाम- तलावकडे जाणारा मार्ग, खामतलाव ते शास्त्रीनगर वॉर्ड, देशबंधू वॉर्ड ते बजरंग चौकाकडे जाणारा मार्ग, राजीव गांधी चौक ते नागपूर नाका मार्ग, राम मंदिर वॉर्डातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत.