संगणकाच्या वापरामुळे ग्रंथालय प्रेमींमध्ये घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:36 PM2018-06-08T23:36:30+5:302018-06-08T23:36:46+5:30
संगणक युगात एका क्लिकवर माहितीचा खजिना तुमच्यासमोर रिता होत असतो. यामुळे घरबसल्या माहिती त्वरित मिळते. परिणामी, ग्रंथालयात जाऊन वेळ घालविणे अनेकांना मंजूर नसल्याचे दिसून येते. चांगली ज्ञानवर्धक पुस्तके ग्रंथालयात जाऊन वाचण्याची सवय कमी झाल्याचे निदर्शनास येत असून ग्रंथालयप्रेमींच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: संगणक युगात एका क्लिकवर माहितीचा खजिना तुमच्यासमोर रिता होत असतो. यामुळे घरबसल्या माहिती त्वरित मिळते. परिणामी, ग्रंथालयात जाऊन वेळ घालविणे अनेकांना मंजूर नसल्याचे दिसून येते. चांगली ज्ञानवर्धक पुस्तके ग्रंथालयात जाऊन वाचण्याची सवय कमी झाल्याचे निदर्शनास येत असून ग्रंथालयप्रेमींच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.
आपले मुखोद्गत साहित्य शब्दबद्ध केल्याने ते वाचायला सोपे झाले आणि आजपर्यंत टिकून राहिले. तंत्रज्ञानाने उत्तरोत्तर केलेल्या प्रगतीने आज सर्व लिखित स्वरूपातील ज्ञान संगणकावर जसेच्या तसे व एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. पूर्वीवाचन म्हटले की, पुस्तकांशिवाय पर्याय नव्हता; पण संगणकाने याची सोय केल्याने ग्रंथालयात जाऊन वा ग्रंथालयातून पुस्तक आणून ते वाचण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. आज शासनाने विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाचनाची सवय लागावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी 'गाव तिथे ग्रंथालय' सारख्या योजना सुरू केल्या; पण मनोरंजनाची अनेक साधणे घरीच उपलब्ध झाल्याने वाचन कमी झाले. पर्यायाने वाचनालयात जाणेही कमी झाले आहे.
जुन्या पिढीच्या लोकांची वाचनाची सवय आजही कायम आहे; पण नवीन पिढी वाचनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. नाटक, कथा, कांदबऱ्या, कवितासंग्रह, आत्मचरित्र हे वाचण्याजोगे साहित्य आहे; पण आज हे सर्व टीव्हीवर पाहण्यातच नवी पिढी धन्यता मानत आहे. शालेय वाचनाची जागाही आता ई-लर्निंगने घेतली आहे. पुस्तके घरी असणे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे; पण आता ती जागा संगणकाने घेतली आहे. पुस्तके वाचणे चेष्टेचा विषय ठरत आहे.
ई-लर्निंगचा धडाका
'वाचाल तर वाचाल' अशी म्हण पूर्वीप्रचलित होती; पण पुस्तकांची जागा आता ई-लर्निंगच्या साहित्याने घेतल्याचे दिसून येत आहे. बदलल्या काळात शाळांतही ई-लर्निंगचा धडाका असल्याने पुस्तकांचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. पूर्वी नाटकांची पुस्तके, कथा, कादंबरी आदी मनोरंजनाची साधने होती; पण टीव्हीरूपी मनोरंजनामुळे वाचनाकडे सामान्यांचे दुर्लक्ष होत असून जुन्या व नवीन पिढीमध्ये दुरावाही निर्माण होत असल्याचेच दिसून येत आहे.