जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
By admin | Published: February 6, 2017 12:19 AM2017-02-06T00:19:55+5:302017-02-06T00:19:55+5:30
केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटली. यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
केबलचा खड्डा ठरला कारणीभूत : तहसील कार्यालय परिसरातील प्रकार, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
भंडारा : केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटली. यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. हा प्रकार एका वॉर्डातील नसून राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या तहसील कार्यालय पसिरातील आहे. जिल्हा प्रशासनाची मुख्य कार्यालये व हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हा प्रकार असून याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्ताचे मुख्यालय लाभलेल्या भंडारा शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. अतिक्रमण, शुद्ध पाणी, रस्त्याचे विस्तारीकरण, आठवडी बाजार, पार्किंग आदी समस्या कायम असताना समस्या सोडविण्यापेक्षा त्यात भर पडत आहे की काय? असे दिसून येते. दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी भंडारा तहसील कार्यालय येतात. त्याच तहसील कार्यालय इमारतीच्या डाव्या बाजुला केबल घालण्याची कार्य सुरू आहे. कदाचित इंटरनेट सेवेचे हे कबल घालण्याचे कार्य सुरू आहे. सदर कार्य करण्याकरिता तहसील कार्यालयासमोरील डाव्या बाजुला असलेल्या अर्जनविसांचे बस्ताण असलेल्या जागेजवळून केबल खोदण्याचे कार्य करण्यात आले. खोदण्यात आलेल्या खड्यामुळे पाणी पुरवठ्याची जलवाहिनी फुटली. या बाबीला पंधारा दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला असून तिथून सतत पाणी वाहत आहे. आतापर्यंत लाखो लीटर पाणी व्यर्थ वाहून गेले आहे. पाण्याचा प्रवाह पश्चिम-पूर्व असून या खड्यातून निघालेले पाणी आधीचे जिल्हा उद्योग केंद्र असलेल्या इमारतीजवळ साचत आहे. (प्रतिनिधी)
पाणीटंचाईत वाढ!
उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वैनगंगा नदीत मुबलक जलसाठा आहे. परंतु राजकिय इच्छाशक्ती व नियोजनाच्या अभावामुळे भंडारेकर आजही शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी तसरत आहेत. त्यातही दूषित पाण्याच्या समस्येने कहर केला आहे. त्यातच जलवाहीनी फुटण्याच्या घटना घडत असतात. अशात एका विभागाच्या कार्यप्रणालीचा फटका सामान्य नागरिकांच्या जीवनावर होत असतो. काही दिवसांपासून लाखो लीटर पाणी व्यर्थ वाया जात असताना पालिका प्रशासन अथवा तत्सम अधिकाऱ्यांना ही बाब दिसत नसावी काय? असा प्रश्न उपस्थित होतो.