तुमसरच्या मुख्य चौकातील डांबरी रस्ता खोदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 09:50 PM2019-03-12T21:50:32+5:302019-03-12T21:50:57+5:30
रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. तुमसरात लोकसभा अचारसंहिता लागण्याच्या तीन दिवसापुर्वी बावनकर चौक ते जूने बसस्थानक दरम्यान मुख्य रस्ता सिमेंट रस्ता बांधकामाकरिता खोदकामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. तुमसरात लोकसभा अचारसंहिता लागण्याच्या तीन दिवसापुर्वी बावनकर चौक ते जूने बसस्थानक दरम्यान मुख्य रस्ता सिमेंट रस्ता बांधकामाकरिता खोदकामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. आठ ते नऊ महिन्यापूर्वी रेल्वे फाटक ते गभने सभागृहापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम अजूनही सुरूच आहे. सध्या या मार्गाने एकेरी वाहतूक सुरू आहे. सदर रस्ता आंतरराज्यीय मार्गाला जूळतो हे विशेष.
विकासाकरिता एक पाऊल पुढे याकरिता शहरातून जाणारा आंतरराज्यीय रस्ता कात टाकीत आहे. डांबरीकरण झालेला रस्ता खोदून सिमेंट रस्ता बांधकाम करणे सुरू आहे. शहरात प्रवेश करणारा हा एकमेव रस्ता असून आठ महिन्यापूर्वी भंडारा मार्गावरील सिमेंट रस्ता बांधकामाला सुरूवात करण्यात आली होती. सध्या या रस्त्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी पुन्हा शहरातील मुख्य रस्ता बावनकर चौक ते जुने बसस्थानकापर्यंत डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. या मार्गावर शाळा, दवाखाना, बँका व इतर दुकाने आहेत. रस्ता सध्या बंद केल्याने मोठी वाहतूक विनोबा बायपास रस्त्याने वळविण्यात आली आहे. विनोबा बायपास देव्हाडी रस्त्यापर्यंत हा सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात येणार आहे. शहरातून आंतरराज्यीय मार्ग जात असल्याने जड वाहतुकीची मोठी समस्या येथे आहे. एकेरी रस्ता येथे पूर्णत: बांधकाम करण्याची गरज आहे. शहरात नाली बांधकाम, पाणीपुरवठा जलवाहिन्यांची कामे रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सदर कामांना यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे, परंतु एकाचवेळी काही कामे सुरू झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहेत. निवडणुकी दरम्यान शहरात मोठी गर्दी होणार आहे. सभा, प्रचार रॅली त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विकास कामाकरिता तुमसरकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषत: रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्याची गरज आहे.