शेतकऱ्यांच्या पीक घेण्यायोग्य जागेत रेतीची डम्पिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:39 AM2021-09-22T04:39:01+5:302021-09-22T04:39:01+5:30
वाळू माफियांची मनमानी : माफियांचे अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे पवनी : तालुक्यातील गुडगाव या घाटातून वाळू उपसा सुरू असून मागील ...
वाळू माफियांची मनमानी : माफियांचे अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे
पवनी : तालुक्यातील गुडगाव या घाटातून वाळू उपसा सुरू असून मागील एक वर्षापासून येथील शेतकऱ्यांच्या पीक घेण्यायोग्य असलेल्या शेतीत अवैधरीत्या वाळू साठा करून उलट संबंधित शेतकऱ्याने हटकले असता, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणाची तक्रार तहसीलदार व पोलीस विभागाने घेण्याचे नाकारले, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
संगीता प्रेमदास रामटेके रा. ब्रह्मपुरी यांचे वडिलोपार्जित मालकीची शेती गुडगाव येथे असून गट नं. ३७३ आराजी ०.७० हे. आर या शेतीत मागील एक वर्षापासून वाळू माफियांनी शेतमालकाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मनमानी करीत अवैधरीत्या वाळूसाठा केला असून, या चोरट्यांना हटकले असता, तुमच्याने जे बनते ते करा, अशी धमकी देत असतात.
यापूर्वी शेतात अवैधरीत्या वाळूसाठा केला असल्याची तक्रार तहसीलदार पवनी, पोलीस स्टेशन पवनी यांना देण्याचा प्रयत्न केला असता, तक्रार घेण्यास संबंधितांनी नाकारल्याचेही पत्रकार परिषदेत सांगून या अवैध वाळू माफियांचे अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याचा आरोपही करण्यात आला. माझ्या शेतात वाळू माफियांकडून करण्यात आलेला अवैध वाळूसाठा त्वरित जप्त करून वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी व माझी शेती मोकळी करून द्यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत संगीता रामटेके यांनी केली. पत्रकार परिषदेत संगीता रामटेके, रणजित कऱ्हाडे, मनोज कऱ्हाडे, दादाजी चहादे, सुमीत मेश्राम, प्रभू मेश्राम, विजय रामटेके उपस्थित होते.
210921\img_20210918_195033.jpg
वाळू माफिया विरुद्ध घेतलेल्या पत्रकार परिषदेत संगीता रामटेके व इतर.