धान कापणीच्या हंगामात ‘पोलीस ठाणे आपल्या गावात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 09:44 PM2018-11-24T21:44:13+5:302018-11-24T21:44:38+5:30

धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन गावात शांततेचे वातावरण निर्माण होत आहे.

During the harvest season, 'Police Thane in your village' | धान कापणीच्या हंगामात ‘पोलीस ठाणे आपल्या गावात’

धान कापणीच्या हंगामात ‘पोलीस ठाणे आपल्या गावात’

Next
ठळक मुद्देफिरत्या पोलीस ठाण्याला प्रतिसाद : नागरिकांचा वेळ व पैशाची बचत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन गावात शांततेचे वातावरण निर्माण होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून दोन वर्षापासून भंडारा जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला ग्रामीण जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या शेती हंगामात शेतकरी व शेतमजूर व्यस्त आहेत.
अशा काळातपोलिसांनी त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांच्या तक्रारी निपटारा करण्याचे काम सुरु केले आहे. आंधळगाव क्षेत्रांतर्गत पांढराबोडी येथे फिरत्या पोलीस ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या.
त्या दोन्ही तक्रारींचा निपटारा करण्यात आला. बँकींग फसवणूक, एटीएम, फ्रॉड, ग्रामसुरक्षा, चोरी आदीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. पवनी तालुक्यातील निष्टी येथे पोलीस निरीक्षक चकाटे यांनी जनतेला वाहतुकीचे मार्गदर्शन केले. याठिकाणी एक प्रकरण दाखल झाले. पालांदूर पोलीस ठाणे अंतर्गत जेवनाळा येथे महिला अत्याचाराविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
लाखांदूर ठाण्यांतर्गत मेंढा येथे पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी मोबाईलद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती दिली. करडी ठाण्यांतर्गत कान्हळगाव येथे ठाणेदार पेंड यांनी आॅनलाईन फ्रॉडबाबत आणि अटक वॉरंटबाबत मार्गदर्शन केले. लाखनी ठाण्यांतर्गत खेडेपार येथेही फिरत्या ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस व जनतेत विश्वासाचे नाते
फिरते पोलीस ठाणे केवळ गुन्हेच नोंंदवून घेत नाही तर विविध विषयांवर मार्गदर्शनही केले जाते. त्यात बँकींग फसवणूक, घरफोडी, चोरी, अंधश्रद्धा निर्मूलन, तक्रार कशी दाखल करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. दारुबंदीबाबतही मार्गदर्शन करून व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले जाते. कामाचा हंगाम असतानाही नागरिक या फिरत्या पोलीस ठाण्याच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यातून पोलीस व जनतेत विश्वासाचे नाते निर्माण होत आहे.

नागरिकांनी फिरत्या पोलीस ठाणे उपक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या, तक्रारी सोडवून घ्याव्यात. विनाकारण प्रकरण न्यायालयापर्यंत नेऊ नये. आपल्या वेळेची व पैशाची बचत करून गावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे.
-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधिक्षक,भंडारा.

Web Title: During the harvest season, 'Police Thane in your village'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.