भरपावसाळ्यात ७७ गावांत पथदिव्यांची बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:51+5:302021-06-28T04:23:51+5:30
तुमसर : ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीने अनेक गावांतील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. काही गावांतील ...
तुमसर : ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीने अनेक गावांतील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. काही गावांतील पाणीपुरवठा योजनांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पावसाळ्यात खेड्यांतील गावांत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामीण भागातील गाव, खेडे, तांडे अंधारमय झाले असून सरपटणारे जीव यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडे निधी नसल्यामुळे वीजबिल कुठून भरावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने पंधराव्या वित्त आयोगात निधी देण्याची घोषणा केली; परंतु अद्याप ग्रामपंचायतींना निधीची प्रतीक्षा आहे.
तुमसर तालुक्यातील ७७ ठिकाणी सध्या पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी संपूर्ण खेडेगाव अंधारमय होत आहे. ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नसल्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल भरण्यास असमर्थ ठरले आहेत. ग्रामीण भागात पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना निधी देत होते, परंतु १५ व्या वित्त आयोगातून राज्य शासनाने ग्रामपंचायतींना निधी दिला नाही. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत आल्या आहेत. ग्रामपंचायतींपुढे पेच निर्माण झाला आहे.
ऐन पावसाळ्यात वीज वितरण कंपनीने थकीत बिलापोटी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामीण परिसरात सरपटणारे जीव यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शेतशिवारात अनेक गावे वसलेली आहेत, त्यामुळे अधिकच धोका निर्माण झाला आहे.
पाणीपुरवठा योजना रडारवर : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहेत. संपूर्ण गावाला या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाण्याचे वितरण करण्यात येते. पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकीत असल्याने त्यांचाही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात खेड्यांतील नागरिकांना विहिरींचे अशुद्ध पाणी प्यावे लागणार आहे. यामुळे नागरिकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाचे आदेश : चार दिवसांपूर्वी शासनाने पंधराव्या वित्त आयोगाचे जिल्हा परिषदेला निधी देण्याचे सांगितले. ऊर्जामंत्र्यांना साकडे घालण्यात आले. परंतु, संबंधित विभागाकडे रीतसर आदेश अजूनपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून अंधारमय वातावरणातच राहावे लागणार आहे.