संपकाळात एसटी बसेसमधून दररोज 14 हजार प्रवाशांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 05:00 AM2022-02-07T05:00:00+5:302022-02-07T05:00:52+5:30
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गत तीन महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे एसटीची चाके ठप्प होती. शासनस्तरावर विविध बोलण्या होऊनही अनेक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशा स्थितीत भंडारा विभागाने प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता, बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. गत तीन आठवड्यांपासून बसेस धावत आहेत. या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विस्कटलेली एसटीची घडी बसविण्याचा प्रयत्न सुरू असून, कंत्राटी व नियमित कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सध्या भंडारा आगारातून ७१ एसटी बसेस धावत आहेत. दररोज १४ हजार प्रवासी प्रवास करीत असून, नागपूर मार्गावरील बसेस खचाखच भरून जात आहेत.
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गत तीन महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे एसटीची चाके ठप्प होती. शासनस्तरावर विविध बोलण्या होऊनही अनेक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशा स्थितीत भंडारा विभागाने प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता, बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. गत तीन आठवड्यांपासून बसेस धावत आहेत. या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भंडारा विभागातील सहा आगारांत ३६७ बसेस असून, त्यापैकी ७१ बसेस रस्त्यावर धावत आहेत. नागपूर, गोंदिया, साकोली, तिरोडा, तुमसर या मार्गावर दररोज बसफेऱ्या सुरू आहेत. सरासरी १४ हजार प्रवासी बसेसमधून प्रवास करीत आहेत. भंडारा विभागातील ४१० विविध कर्मचारी कामावर रुजू झाले असून, अद्यापही ११०० कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यांना अल्टिमेटम देण्यात आला आहे.
६१० कर्मचाऱ्यांवर कारवाई
- भंडारा विभागातील संपात सहभागी झालेल्या ६१० कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. त्यात १६३ नियमित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. २७७ कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर ८६ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती आणि ८४ कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे.
५० कंत्राटी चालक सेवेत
- राज्य परिवहन महामंडळाने कंत्राटी चालकांच्या भरवशावर बससेवा सुरू केली आहे. भंडारा आगारात ५० कंत्राटी चालक सेवा देत आहेत, तर पाच वाहन तपासणी अधिकारीही सध्या चालकाची भूमिका बजावत आहेत. यांत्रिक कर्मचाऱ्यांना चालक म्हणून नियुक्ती देण्यासाठी वरिष्ठांसोबत पत्रव्यवहार करण्यात येत आहे.
भंडारा विभागातून बससेवा सुरळीत करण्याचा निरंतर प्रयत्न सुरू आहे. आणखी कंत्राटी चालक पुरविण्यासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.
-डाॅ. चंद्रकांत वडस्कर,
विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.