जलपर्यटनाच्या उद्घानादरम्यान पत्रकारांची बोट बुडताना बचावली
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: June 24, 2024 08:34 PM2024-06-24T20:34:03+5:302024-06-24T20:34:20+5:30
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान मोठी दुर्घटना टळली
भंडारा : येथील कारधा पुलालगतच्या वैनगंगा नदीच्या पात्रात सोमवारी मोठा दुर्घटना टळली. जलपर्यटनाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचे बोटींग करतानाचे फोटो घेण्यासाठी लागलेल्या चढाओढीत पत्रकार व छायाचित्रकार असलेली बोट एका बाजुला कलली. त्यामुळे सोफा पाण्यात पडला. बोटीत पाणी शिरले. प्रसंगावधान राखून बोटीचे चालक गोविंद खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बसविले, पर्यायाने बोट बुडताना बचावली आणि मोठी दुर्घटना टळली.
भंडारा जिल्हा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोसेखुर्द जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमादरम्यान जल पर्यटनाची प्रात्यक्षिके झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली. नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या. त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आठ जण होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार दुसऱ्या बोटी मध्ये पत्रकारांना घेतले. या बोटीचे वाहक हे गोविंद खवणेकर होते. बोट सफर करताना मुख्यमंत्र्यांनी प्रतिकात्मक म्हणून स्वतः बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली. बोट हे चालवतानाचे क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. बोट चालकाने एका बाजूला न जाण्याची आणि बसण्याची वारंवार विनंती केली.
परंतु त्याकडे दुर्लक्ष करून सर्वजण एकाच बाजुला आल्याने वजनाने बोट पुढील एका बाजूस झुकली. त्यामुळे बोटीचा पुढचा भाग पाण्यात गेला. पाण्याच्या दबावाने बोटीतील बसण्याचा भाग ओढला गेला व सोफासेट पाण्यात पडला. बोटीत पाणी शिरले. प्रसंगावधान राखून बोट चालकांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बोटीमध्ये बसवले. हा अपघात घडत असल्याचे लक्षात येताच सुरक्षेसाठी काठावर तैनात असलेले जेटस्कि आणि रेस्क्यू टीमने पाण्यात उड्या घेऊ बोटीपर्यंत पोहचले. त्यानंतर सर्व पत्रकारांना सुरक्षितपणे काठावर आणण्यात आले.
प्रशासन म्हणते, बोटीला नुकसान नाही
या घटनेबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करताना बोटीला अथवा पत्रकारांना कोणतही नुकसान नसल्याचे, कुणीही पाण्यात पडले नसल्याने प्रशासनाने कळविले आहे. घटनेनंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे एमटीडीसीचे महाव्यवस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक डॉ.सारंग कुलकर्णी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी कळवले आहे.
क्षमतेपेक्षा अधिक पत्रकार बसले बोटीत
या बोटीची क्षमता ८ व्यक्तींची आहे. मात्र क्षमतेकडे दुर्लक्ष करून १४ ते १५ पत्रकार त्यात स्वार झाले. बोट अगदी नदीच्या मध्यभागापर्यंत गेली होती. या दरम्यान सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यानेच ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.