वर्षभरात ६० कोटींची रेती चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:48 PM2019-06-29T22:48:02+5:302019-06-29T22:48:24+5:30
जिल्ह्यात रेती माफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून प्रत्येक रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू आहे. या चोरट्यांना महसूल विभागाची साथ मिळत असल्याने ते कुणालाही जुमानत नाही. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असला तरी कोणतीही कारवाई होत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात रेती माफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून प्रत्येक रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू आहे. या चोरट्यांना महसूल विभागाची साथ मिळत असल्याने ते कुणालाही जुमानत नाही. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असला तरी कोणतीही कारवाई होत नाही. रेती चोरट्यांनी वर्षभरात ६० कोटींची रेती चोरुन नेल्याचा आरोप करीत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा सदस्य नरेश डहारे यांनी पत्रपरिषदेत केली.
ते म्हणाले, भंडाऱ्यातील रेतीची सर्वात मोठी बाजारपेठ नागपूर आहे. एका दिवसाला सातशे ते आठशे ट्रक रेती ओव्हरलोड भरून नागपूर व अन्य ठिकाणी नेली जाते. हा सर्व प्रकार महसूल विभाग व पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे. ट्रक मालकाने दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक मालक ५० हजार रुपये एन्ट्रीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना देतात. त्यात आरटीओ, पोलिस, ज्यांच्या हद्दीप्रमाणे महिने बांधलेले आहेत. तहसीलदारांचाही महिना ठरलेला असल्याने कुणीही कारवाई करण्यासाठी धजावत नाही. जिल्हा व तालुका स्तरावर महसूल व पोलिस विभागाचे पथक असले तरी घाटावर धाड मारण्यापूर्वीच या पथकातील अधिकारी रेती चोरांना सतर्क करीत असतात. कारवाई केलीच तर राजकीय पुढारी मध्यस्थी करून कारवाई बंद पाडतात, असाही आरोप नरेश डहारे यांनी केला आहे. जिल्ह्यात २०१९-२० अंतर्गत वर्षामध्ये सुमारे ३५ ते ४० कोटीचे रेती घाट विकलेले आहे. जिल्हा प्रशासनाने रेती विक्री करीत असताना १५५५ रुपये आॅफसेट प्राईजने विक्री काढली. बोलीमध्ये ती त्यापेक्षा महाग गेली. सरकारने एग्रीमेंटमध्ये चारशे रुपये रेट देते. त्यांचे दुष्परीणाम सरकारी कंत्राटदारांवर झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.
शासनाचे कोट्यवधींचे नुकसान
जिल्ह्यात मे २०१८ पासून आजपर्यंत ५० वर्षात झाले नाही इतका रेतीचे दोन ते तीन किलोमीटरवर उत्खनन झाले आहे. या घाटांना पर्यावरणाची मंजूरीही मिळालेली नाही. तरीसुद्धा वैनगंगा व सूरनदीमधून अतोनात उत्खनन झाल्याने आता रेती शिल्लक राहीली नाही. मोहाडी तालुक्यातील रोहा, ढिवरवाडा, कन्हाळगाव, मुंढरी, निलज, देव्हाडी, सुकळी, पाचगाव, नेरी, बोथली, पांजरा, मोहगाव देवी, भंडारा तालुक्यातील खमारी बुटी, टाकळी पुनर्वसन, कोथूर्णा, लावेश्वर, दाभा, इंदूरखा, पवनी तालुक्यातील कुर्झा, इटगाव, येनोळा, पवनी, जुनोना, वलनी, धानोरी, भोजापूर, गुडेगाव, खातखेडा, तुमसर तालुक्यातील आष्टी, सोंड्याटोला, ब्राम्हणी, माडगी, बोरी पांजरा, तामसवाडी या घाटतून रेतीचे उत्खनन झालेले असून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडालेला आहे.