तुमसरकरांच्या नशिबी धूळच धूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 09:47 PM2018-09-16T21:47:03+5:302018-09-16T21:47:20+5:30
दुर्गा नगर ते गभणे सभागृह पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम वाहतुकीस पर्यायी व्यवस्था न करता घाईगडबडीत सुरु करण्यात आले आले आहे. मात्र ही कामे कासवगतीनेच सुरु आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची डागडूजी होत आहे.
राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : दुर्गा नगर ते गभणे सभागृह पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम वाहतुकीस पर्यायी व्यवस्था न करता घाईगडबडीत सुरु करण्यात आले आले आहे. मात्र ही कामे कासवगतीनेच सुरु आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची डागडूजी होत आहे. पावसाने उघडीप घेतल्याने मात्र सणासुदीतही तुमसरकरांच्या नशिबी धुळच धुळ राहणार आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
अर्थसंकल्पीय बजेटमध्ये समाविष्ट करून दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे सिमेंटीकरणाचे ४४० लक्ष रुपयांचे काम संबंधित कंत्राटदाराने १५ टक्के बिलोमध्ये घेतले. रनिंग बिल काढण्याच्या लगीनघाईत दुहेरी रस्त्याला वाहतुकीस योग्य न बनविता भर पावसाळ्यात एकेरी मार्गाचे खोदकाम करण्यास सुरुवात केली. परिणामी सुरु असलेल्या एकेरी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले. त्यात पाणी साचून अनेकदा अपघात घडले. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. दरम्यान 'लोकमत'ने या समस्येकडे लक्ष वेधताच संबंधित कंत्राटदाराने घाईगडबडीत रस्त्याची डागडुजी ओबडधोबड केली. परिणामी रस्त्यात आणखी मोठमोठे खड्डे पडले. त्यात पुन्हा मुरुम टाकले आहेत. पाऊस पडल्यावर हा रस्ता चिखलांनी माखतो. त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. दरम्यान पावसाने आता उघडीप घातली आहे.
या रस्त्यावर राज्य मार्ग, बसस्थानक, बँका, महाविद्यालय, दवाखाने, मोठमोठे व्यवसायीक असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. रस्त्यावरून मोठे व जड वाहने गेल्यास धुळीचा अक्षरश: धुव्वा उडतो. त्यामुळे समोरचे वाहन देखील दिसत नाही. तोंड व नाकावाटे धूळ शरीरात जाते. यामुळे तुमसरकरांना विविध आजारांनी जडले आहे. याशिवाय डोळ्यांच्या त्रासातही वाढ झाली आहे. मात्र काम हे कासवगतीनेच सुरु असल्यामुळे इकडे आड तिकडी विहिर अशी तुमसरकरांची स्थिती आहे.
रस्त्याचे काम असेच कासवगतीने सुरु राहिल्यास आणखी तीन महिने तुमसरकरांना धुळीचा त्रास सोसावा लागणार का? संबंधित विभागाने यावर उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-अनिल बावनकर, माजी आमदार, तुमसर.