धुळीमुळे शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:01:39+5:30
अर्धवट असलेल्या कामामुळे धुळीच्या त्रास रस्त्याहून प्रवास करणाऱ्यांना सतावत आहे. परंतु या मार्गावर पाणी घालण्यात येत नाही. दुचाकी असो की चारचाकी वाहन उडणाऱ्या धुळीमुळे समोरुन कोणते वाहन येत आहे, हे सुध्दा लक्षात येत नाही. परिणामी जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना रहदारी करावी लागत आहे.
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे रुपांतर महामार्गात करुन निलजफाटा ते कारधा टोल नाक्यापर्यंतचा रस्ता बांधकामाला वर्षभरापुर्वी सुरुवात झाली. मात्र लॉकडाऊन काळात बांधकाम बंद झाल्याने धुळीमुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्या कंपनीला रस्ता बांधकामाचे कंत्राट आहे, त्यांनी सुध्दा रस्त्यावर पाणी मारण्याचे सौजन्यही दाखविले नाही.
महामार्ग बांधकामाला एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी होत आहे. रस्त्याचे बांधकाम अधूनमधून बंद असल्याने या कामाला गतीही मिळाली नाही.
अर्धवट असलेल्या कामामुळे धुळीच्या त्रास रस्त्याहून प्रवास करणाऱ्यांना सतावत आहे. परंतु या मार्गावर पाणी घालण्यात येत नाही. दुचाकी असो की चारचाकी वाहन उडणाऱ्या धुळीमुळे समोरुन कोणते वाहन येत आहे, हे सुध्दा लक्षात येत नाही. परिणामी जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना रहदारी करावी लागत आहे.
धुळीवर ताबा मिळविण्यासाठी पाणी मारण्याचे कार्यही करण्यात येत नसल्याने परिसरातील ग्रामस्थही संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे एका बाजुने सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले असले तरी तिथेही पाणी घालण्यात येत नाही. त्यामुळे झालेले बांधकाम दर्जेदार होणार काय? असा प्रश्नही विचारला जात आहे.
अपघाताचे सत्र सुरुच
धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तव्दतच रस्त्यावर खड्डा किंवा खोलगट भाग असल्यास तोही पटकन दिसत नसल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. अशा स्थितीला जबाबदार कोण अशा प्रश्नही नागरिक विचारीत आहे.