देव्हाडी रेल्वे उड्डाणपूल अडकला ‘जीएसटी’त
By admin | Published: July 17, 2017 12:25 AM2017-07-17T00:25:26+5:302017-07-17T00:25:26+5:30
वस्तू व सेवा कराबाबतची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल निविदेला ‘जीएसटी’चा फटका बसला
४२ कोटींचा उड्डाणपूल : तांत्रिक अडचण, आॅक्टोबर २०१७ पर्यंत होती पूर्णत्वाची मुदत, राज्य शासनाने दिली सहा महिन्यांची मुदत
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : वस्तू व सेवा कराबाबतची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल निविदेला ‘जीएसटी’चा फटका बसला असून काही तांत्रिक अडचणीत रेल्वे उड्डाणपुल जीएसटीत अडकल्याची माहिती आहे. देव्हाडी येथे राज्य शासनाचे मुख्य अभियंत्यासह, अधीक्षक अभियंता व इतर अधिकाऱ्यांनी नुकतीच कामांची पाहणी केली. फिल्टर मिडीयाची माहिती जाणून कंत्राटदार व अभियंत्यांना निर्देश दिले.
राज्य शासन व रेल्वे विभागाचा संयुक्त रेल्वे उड्डाणपुल देव्हाडी येथे रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर तयार होत आहे. उड्डाण पुलाची एकुण किंमत ४२ कोटी इतकी आहे. राज्य शासन २६ कोटी तर रेल्वे विभाग १६ कोटी रूपये येथे बांधकामावर खर्च करणार आहे. राज्य शासनाने प्रत्यक्ष कामाला जून २०१४ मध्ये सुरूवात केली होती. पोचमार्ग तयार करण्याचे काम राज्य शासनाकडे आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये हा पोचमार्ग पूर्णत्वास करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु स्थानिक अडचणींमुळे त्यात सहा महिन्यांची वाढ राज्य शासनाने दिल्याची माहिती आहे. मार्च २०१८ अखेर दोन्ही पोचमार्ग पूर्णत्वास येणार आहेत.
रेल्वे येथे ८० मिटर मुख्य सिमेंट पुलाचे कामे करणार आहे. परंतु रेल्वेची निविदा मागील महिन्यापर्यंत निघाली नव्हती. रेल्वेने निविदा या महिन्यात काढली. एका कंत्राटदाराला येथे कंत्राट प्राप्त झाले. परंतु जून महिन्यापासून देशात जीएसटीचा कायदा आला. त्या कायद्यात ही निविदा अडकल्याची माहिती आहे. काही तांत्रिक बाबी येथे पुढे आल्याची माहिती आहे. तांत्रिक बाबीत रेल्वेची निविदा येथे अडकल्याचे समजते. त्यामुळे रेल्वे उड्डाणपुल पूर्णत्वाला पुन्हा वेळ लागण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने नागपूर विभागाचे मुख्य अभियंता देबटवार, अधीक्षक अभियंता नवघरे, कार्यकारी अभियंता नरेश वडेटवार, उपविभागीय अभियंता भट, उड्डाणपुलाचे प्रोजेक्ट अभियंता बी. आर. पिपरेवार, तुमसरचे उपविभागीय अभियंता खंडेलवाल, मोहाडीच्या उपविभागीय अभियंता विजया सावरकर, कंत्राटदार भंसाली यांनी उड्डाणपुल बांधकामाचे निरीक्षण केले. फिल्टर मिडीयाची माहिती मुख्य अभियंता देबटवार यांनी जाणून घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले. दोन्ही अॅप्रोच (पोचमार्ग) मार्गावरील सर्व्हीस रोडवरील खड्डे बुजविण्याचे व रस्ता तयार करण्याचे आदेश यावेळी मुख्य अभियंत्यांनी दिली. २४ तास वाहतुकीचा मार्ग असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अप्रोच मार्गावर घालत असलेल्या अॅश (राख) बाबत आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळ्यात सर्व्हीस रस्ता निसरडा नसावा अशा सूचना त्यांनी दिल्या.