जलतरण तलावात बुडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:36 PM2018-06-18T23:36:26+5:302018-06-18T23:37:11+5:30

वडिलांकडे दुकानात जातो, असे सांगून रविवारला सकाळी १० वाजता घरून निघून गेलेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या एका १३ वर्षीय बालकाचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सोमवारला सकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून जिल्हा क्रिडा संकुलातील सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Dying in the swimming pool, the child dies | जलतरण तलावात बुडून बालकाचा मृत्यू

जलतरण तलावात बुडून बालकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर : शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वडिलांकडे दुकानात जातो, असे सांगून रविवारला सकाळी १० वाजता घरून निघून गेलेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या एका १३ वर्षीय बालकाचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सोमवारला सकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून जिल्हा क्रिडा संकुलातील सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तोफिर शेख कय्यूम शेख (१५) रा.बैरागी वाडा, भंडारा असे मृत बालकाचे नाव आहे. रविवारी जलतरण तलाव बंद असतोे. त्याठिकाणी चौकीदार असतो. तोफिर शेख हा रविवारी सकाळी ११ वाजता घराबाहेर पडला. त्यानंतर तो आपल्या दोन मित्रांसह जलतरण तलावाच्या दिशेने गेला. जलतरण केंद्र बंद असल्यामुळे आवारभिंतीवरून उडी घेऊन हे तिघेही आतमध्ये शिरले. दरम्यान, जलतरण तलावात खोल पाण्यात गेल्याने तोफिर बुडू लागला. हे बघून त्याच्या दोन्ही मित्रांनी तिथून पळ काढला. तथापि, ते पळून जात असताना तेथील सुरक्षारक्षकाने त्यांना हटकले. त्या मुलांनी तोफिर तलावात बुडाल्याची माहिती सुरक्षा रक्षकाला दिली होती. परंतु, सुरक्षारक्षकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होत आहे. इकडे, दिवसभरापासून बेपत्ता असलेल्या तोफिरची शोधाशोध सुरू होती. तो बेपत्ता झाल्याची तक्रार भंडारा पोलिसात करण्यात आली होती.
सोमवारी सकाळी जलतरण केंद्रात पोहण्यासाठी आलेल्या काही जणांना एका बालकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही माहिती सकाळी क्रिडा संकुलात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना माहित होताच जलतरण तलावावर गर्दी झाली. चौकशीअंती तो मृतदेह तोफिरचा असल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षारक्षकाने तोफिरच्या मित्रांच्या सुचनेची वेळीच दखल घेतली असती तर कदाचित तोफिरचे प्राण वाचू शकले असता. जलतरण केंद्रात कोणतीही सुरक्षा नसल्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी, जलतरण केंद्र चालक व सुरक्षा रक्षकावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
क्रीडा अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार असताना या संकुलाचे देखभाल आणि दुरूस्तीचे काम वेळोवेळी व्हायचे. भाग्यश्री बिले या क्रिडा अधिकारी म्हणून रूजू झाल्यापासून या क्रीडा संकुलाला दुर्देशेचे दशावतार सुरू झाले. या संकुल परिसरात सुविधांबाबत नागरिकांनी त्यांना यापूर्वी अनेकदा निवेदने दिले आहेत. परंतु कुठलिही उपाययोजना बिले यांनी केली नाही. दरम्यान, भंडारा शहरातील नागरिकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांना निलंबित करण्यात यावे आणि तोफिरच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी केली. दरम्यान, नागपूर येथून क्रीडा उपसंचालकांनी भंडारा जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयाला भेट देऊन याबाबतची तपशिलवार माहिती जाणून घेतली. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बिले यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात यावी, याबाबत प्रधान सचिवांशी चर्चा केली.
पालकमंत्र्यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन
जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात मृत्यू झालेल्या तोफिर शेख या बालकाच्या कुटुंबियांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारला सायंकाळी भेट घेतली. घरी जावून शेख कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाच्यावतीने शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी देऊन आपल्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचे पालकमंत्र्यांनी या कुटुंबाला सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Dying in the swimming pool, the child dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.