गतिमान प्रशासन हेच कामाचे सूत्र
By Admin | Published: June 3, 2015 12:46 AM2015-06-03T00:46:56+5:302015-06-03T00:46:56+5:30
जनतेच्या प्रश्नांप्रति संवेदनशील राहून प्रशासन गतिमान करण्यावर आपला भर राहील.
पत्रपरिषद : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची ग्वाही
भंडारा : जनतेच्या प्रश्नांप्रति संवेदनशील राहून प्रशासन गतिमान करण्यावर आपला भर राहील. सिंचनाअभावी हरीतक्रांती रखडलेल्या गोसेखुर्द प्रकल्पबाधितांचे पुनवर्सन, तलावांचे पुनरूज्जीवन ही कामे प्राधान्यक्रमाने करण्यात येतील. ‘टीम वर्क’ वर आपला विश्वास असून पारदर्शक प्रशासन हेच आपल्या कामाचे सूत्र असल्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्ह्यात वने, तलाव, खनिज अशी खूप क्षमता असून त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात खरीपाच्या लागवड क्षेत्रापैकी रबीचे लागवड क्षेत्र कमी आहे. ते वाढविण्यासाठी योजना आखावी लागणार आहे. जिल्ह्यात टसर, मत्स्यपालन, ऊस पीक, हळदीचे पीक होत असून टसरचे क्लस्टर डिझाईन करण्यासाठी वाव आहे. ‘भंडारा सिल्क साडी’ या ब्रॉण्डने जिल्ह्याची ओळख झाली पाहिजे, यासाठी काम करायचे आहे. नोव्हेबर महिन्यात खासदार नाना पटोले यांच्या कल्पनेतून साकार होणारा वैनगंगा महोत्सव साजरा करण्यासाठी योजना आखण्यात येत आहे.
जलयुक्त शिवार हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातंर्गत ४७० कामे घेण्यात आली असून ३५० कामे झालेली आहे. १५ जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. भंडारा तलावांचा जिल्हा असल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत तलावांची देखभाल व दुरुस्ती करुन त्याचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.
३ जूनपासून पर्यावरण सप्ताह
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ३ ते ९ जून असा पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात वृक्ष लागवड व संवर्धन करायचे असून ८ ते १० लाख वृक्ष लागवड करण्यात येईल. यासाठी जनतेने कर्तव्य म्हणून सहकार्य केले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
- तर बॅकांविरुद्ध एफआयआर
शेतकऱ्यांना ज्या बॅका कर्ज देणार नाही किंवा सक्तीने कर्ज वसुली केली तर अशा बॅकांविरुद्ध १३३, १८८ या कलमान्वये कारवाई करण्यात येईल. गरज पडली तर एफआयआर सुद्धा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी स्पष्ट केले.
ई-आॅफिस करणार
यापूढे जिल्हा प्रशासनात पारदर्शक कामे होणार असून ही कामे जनतेला कळावी यासाठी आपली भविष्यात ‘ई-आॅफिस’ करण्याची संकल्पना आहे. जेवढी माहिती प्रशासनाकडे आहे ती माहिती जनतेला कळण्यासाठी संकेतस्थळावर टाकण्यात येईल.
रेती तस्करी रोखणार
रविवारच्या दिवशी रेती घाटातून उपसा करण्यात येऊ नये, असा नियम आहे. यापूढे कोणत्या घाटातून रेतीचा किती उपसा झाला याची नियमित नोटींग करण्यात येणार असून रेतीच्या तस्करीवर आळा घालण्यात येणार असल्याचे सांगितले.