जिल्हास्तरीय प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन
By admin | Published: July 12, 2017 12:28 AM2017-07-12T00:28:24+5:302017-07-12T00:28:24+5:30
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भंडारा येथे उभारण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारला ई-भूमिपूजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भंडारा येथे उभारण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारला ई-भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यातून ई-भूमिपूजन केले. यावेळी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रधान सचिव राजेशकुमार उपस्थित होते.
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात या ई-भूमिपूजन कार्यक्रमाला आ.चरण वाघमारे, आ.रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, उपसंचालक देशकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक शिवाजी पदमणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे जिभकाटे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप मैदमवार, सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ.रेखा बोधनकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक खापरे, पाणी गुणवत्ता तंत्रज्ञ मडामे, कातुरे, पंचभाई, लांडे व मोरके उपस्थित होते. भंडारा येथे ३२.७० लाख रूपये खर्च करुन जलस्वराज-२ कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील १७१ प्रकल्पाचे ई-भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाणी पुरवठयाचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पिण्याचे शुध्द पाणी देण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशिल राहणार आहे. सोमवारी ई-भूमिपूजन करण्यात आलेल्या सर्व योजना निश्चित कालावधीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.चरण वाघमारे, आ. रामचंद्र अवसरे यांच्याशी संवाद साधला. ई-भूमिपूजन हा कार्यक्रम अतिशय अविस्मरणीय व शासनाचा निधी वाचवणारा असल्याचे सांगून आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री, पाणी पुरवठा मंत्री व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.