ई पीक पाहणीमध्ये शेतकरी ‘भाता’वर अडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:39 AM2021-09-22T04:39:23+5:302021-09-22T04:39:23+5:30
दिनेश रामटेके आमगाव (दिघोरी) : शासनाने २०२१ - २२ या खरीप हंगामामध्ये सातबाऱ्यावर शेतामध्ये लावलेल्या उत्पादनाची नोंद करण्यासाठी ई ...
दिनेश रामटेके
आमगाव (दिघोरी) : शासनाने २०२१ - २२ या खरीप हंगामामध्ये सातबाऱ्यावर शेतामध्ये लावलेल्या उत्पादनाची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप नव्याने आणले असून, यामध्ये स्वतः शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंदणी करायची आहे. भंडारा तालुक्यातील आमगाव येथील अनेक शेतकऱ्यांनी या मोबाईल ॲपमध्ये आपल्या शेतामध्ये धानाची लागवड केल्याची नोंद केल्याने ती नोंदणी रद्द झाली असून, यामध्ये भात ही लागवड करायची आहे. परिसरामध्ये धान हा शब्द परिचित आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा यामध्ये सुधारणा करून नव्याने नोंदणी करण्याची वेळ आली आहे.
अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसून, त्या शेतकऱ्यांना इतरांकडे नोंदणीसाठी जावे लागत आहे किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन नोंदणी करायची आहे. आता शेतकरी शेतातील कामे बाजूला सारून आपल्या सातबारामध्ये पिकाची नोंदणी करण्यासाठी भटकताना दिसत आहेत. ही नोंदणी झाल्यावरसुद्धा संबंधित तलाठी जोपर्यंत मंजुरी देणार नाही, तोपर्यंत त्या सातबारामध्ये नोंद होणार नाही. अनेक शेतकऱ्यांनी नोंद केल्यानंतर आपला सातबारा मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये गेले. मात्र, त्यांना सातबारा मिळालेला नाही. त्यामुळे ही नोंदणी ऐच्छिक ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे अनेक सुशिक्षितांना सुद्धा या ॲपवर नोंदणी करणे जिकिरीचे होत आहे.