ई-केवायसी आवश्यक, अन्यथा नोव्हेंबरपासून होणार रेशन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 02:15 PM2024-10-28T14:15:06+5:302024-10-28T14:16:58+5:30
Bhandara : स्वस्त धान्यासाठी पडताळणीची ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी म्हणजेच थम्ब व्हेरिफिकेशन करण्याची अट घातली आहे. जेणेकरून या योजनेतील बनावट लाभार्थीचा शोध ई- केवायसीतून घेतला जाईल. तसेच बोगस लाभार्थीना चपराक बसेल. थम्ब व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर स्वस्त धान्य वाटप १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.
थम्ब व्हेरिफिकेशनला अवघे काही दिवस उरले असल्याने रेशन कार्डधारकांची व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसाठी लगबग सुरू झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्त धान्य मिळवण्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, ज्या शिधापत्रिकाधारकांनी ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे विनामूल्य मिळणारे स्वस्त धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी ई-केवायसी करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
प्रत्येक लाभार्थीला आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रणेमध्ये आपला आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदांची ही प्रक्रिया असून, ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.
स्थलांतरित कुटुंबालादेखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई- केवायसी करावी लागेल. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ही प्रक्रिया सुरू असून, शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे.
वेळेपूर्वीच आपली ई-केवायसी करून घ्या
शिधापत्रिकेत नावे समाविष्ट असलेल्या कुटुंबीयांनी वेळेपूर्वीच आपली ई- केवायसी करून घ्यावी. तसेच भविष्यात आपले ई-केवायसीअभावी कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.