लपाच्या ई-निविदेत ‘गोलमाल’
By admin | Published: May 24, 2016 12:53 AM2016-05-24T00:53:45+5:302016-05-24T00:53:45+5:30
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने प्रस्तावित कामांसाठी कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविल्या.
प्रसिध्दीत कामांचे विवरण नाही : मर्जीतील कंत्राटदारांसाठी नवीन शक्कल
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने प्रस्तावित कामांसाठी कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविल्या. १८ मे ला निविदा उघडून कामांचे वाटप करावयाचे होते. मात्र, सहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी लोटला असतानाही कामांचे वाटप करण्यात आलेले नाही. केवळ मर्जीतील कंत्राटदारांना कामांचे वाटप करण्यासाठी संबंधीत विभागप्रमुखाने हा सर्व खटाटोप चालविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
शासकीय कामांचे वाटप करताना पारदर्शकता रहावे, यासाठी शासनाने ई-निविदा प्रणाली अस्तित्वात आणली आहे. मात्र, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने नुकतीच काही प्रस्तावित कामांबाबत ई-निविदा प्रसिध्दीस दिली. यात संबंधीत विभाग प्रमुखाने शक्कल लढवून कामांचे विवरण प्रसिध्द केले नसल्याचा आरोप आता काही कंत्राटदारांकडून होत आहे.
तीन लाखांवरील शासकीय कामांसाठी आता ई-निविदा मागविण्यात येतात. कामातील पारदर्शकता दिसावी हा या मागील उद्देश. तीन लाखांच्या आतील कामांना ई-निविदांची गरज नाही. मात्र, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित काही कामे प्रस्तावित आहेत. त्या कामांची ई-निविदा लपाने मागविली आहे. यासाठी संबंधीत विभाग प्रमुखाने एका प्रादेशिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द केली. त्या जाहिरातीत कामांचे सविस्तर विवरण प्रसिध्द करणे गरजेच होते. मात्र, संबंधीत विभागप्रमुखाने तसे न करता केवळ मर्जीतील कंत्राटदारांना कामे देण्यास सुलभ व्हावे, यासाठी प्रस्तावित कामे प्रसिध्द केलेले नाही.
प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीच्या निविदा संकेतस्थळावर मागविण्यात आलेल्या आहेत. मात्र, कामांचे तपशिल नसल्याने अनेक कंत्राटदारांचा हिरमोड झालेला आहे. या प्रकारात ज्या कंत्राटदारांसोबत व्यवहार झाला त्यांनाच ही कामे दिली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.
निविदा अशा मागविल्या
लपा योजनाची दुरूस्तीची कामे लिफापा पध्दतीने करावयाची आठ कामे, नोंदणीकृत कंत्राटदाराकरिता करावयाची तीन कामे (सीएसआरनिधी), नोंदणीकृत कंत्राटदाराकरिता दोन कामे (जययुक्त शिवार अभियान) असे पसिध्दीस दिलेले आहे. वास्तविकतेत करण्यात येणाऱ्या सर्व कामांबाबत निविदा रक्कम, अनामत रक्कम, कंत्राटदारांचा वर्ग, कामाचा कालावधी या सर्व बाबी प्रसिध्द करणे गरजेचे आहे.
आॅफलाईन कामांचे वाटप
कामांसाठी ई-निविदा मागविण्यात आल्या. मात्र, त्यात कामांची सविस्तर माहिती नाही. निविदा १८ मे ला दुपारी ३ वाजता उघडण्यात येणार होती. मात्र, सहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी लोटल्यानंतरही कामांचे वाटप करण्यात आलेले नाही. मागितलेल्या निविदांच्या कामांचे वाटप आॅफलाईन करण्याचा घाट संबंधीत विभागप्रमुखांनी घातल्याचा संशय बढावला आहे.
कार्यकारी अभियंत्यांची टोलवाटोलवी
लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पराते यांना विचारणा केली असता, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देशानुसार जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सर्व कामे तिन लाखांच्या आतील आहेत. कामाच्या किंमतीबाबद विचारणा केली असता त्यांनी टेंडर क्लर्क बडगे यांच्याकडे त्यांचा भ्रमणध्वनी देवून पुढील माहिती विचारण्यास सांगितले. बडगे यांनी सर्व निविदा डाऊनलोड केल्या असून कामाची किंमत बघून सांगतो असे म्हणून भ्रमणध्वनी बंद केला.
ई-निविदेची गरज काय?
तीन लाखांवरील कामांसाठी ही निविदा मागविण्यात येते. मात्र लघु पाटबंधारे विभागाने तीन लाखांच्या आतील कामांकरिता ई-निविदा मागविल्या. त्यामुळे एकंदरीत या निविदा प्रकरण गोलमाल असल्याचे यावरुन लक्षात येते. या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे काही कंत्राटदारांचे म्हणणे आहे.