‘आकाश’ची गरुडझेप इतरांना प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:08+5:302021-09-07T04:42:08+5:30
संजय मते : प्रो कबड्डी स्पर्धेत निवडीबद्दल सत्कार भंडारा : महाराष्ट्र राज्यातल्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ...
संजय मते : प्रो कबड्डी स्पर्धेत निवडीबद्दल सत्कार
भंडारा : महाराष्ट्र राज्यातल्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका येथील पालडोंगरी या छोट्याशा गावातून आकाश पिकलमुंडे यांनी प्रो कबड्डी स्पर्धेत गरुडझेप घेतली. आकाशची गरुडझेप ही इतरांनाही प्रेरणा देणारी आहे, असे मत ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते यांनी केले.
ते आकाशच्या सत्काराप्रसंगी बोलत होते. शासकीय विश्रामगृह येथे आकाश पिकलमुंडे यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आकाशचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मते म्हणाले, आकाश पिकलमुंडे यांनी बालपणापासून मातीत कबड्डी खेळत खेळत त्याने प्रो कबड्डीत गरुडझेप घेतली. त्याच्या यशाने भंडारा जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली. जिल्ह्यातील खेडाळूंचा आकाश पिकलमुंडे यांच्यामुळे आत्मविश्वास वाढला.
शालेय खेळात आकाश पिकलमुंडे याने मातीच्या मैदानात विशेष छाप पाडली. शालेय खेळानंतर आकाश विद्युत महामंडळाकडून खेळायचा या खेळात आकाश पिकलमुंडे विदर्भ एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाऊ लागला. असोसिएशनद्वारे खेळल्या जाणाऱ्या अनेक कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला. २०१० ते २०११ नंतर शालेय खेळात आकाशने एकवेळा राष्ट्रीय स्तरावर पाचवेळा राष्ट्रीय स्तरावर आपली कीर्ती गाजवली. नागपूर विद्यापीठातून पाचवेळा वेस्टन झोन मारुन कलर कोट तर दोनवेळा औरंगाबाद विद्यापीठातून ऑल इंडिया वेस्टर्न झोन गाठून कबड्डी खेळात नाव गाजवले.
२०१२ व २०१५-१६ दोन वेळा सिनिअर नॅशनलपर्यंत आपला डंका वाजवला.
२०२१ च्या प्रो कबड्डीच्या हंगामात प्रथमतः आकाशला एंट्री मिळाली. बंगाल वाॅरियर्सने आकाशला १७ लाख रुपये देऊन खेळायची संधी उपलब्ध करून दिली आहे. आकाशच्या निवडीची बातमी येताच भंडारा जिल्ह्यातील कबड्डी व खेळप्रेमींना उत्साह झाला. आकाश आता बंगाल वाॅरियर्सचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यावेळी बाबा पाटेकर, जीवन भजनकर, संजय मते, संदीप मारबते, उमेश मोहतुरे, अमर भुरे, चेतन चेटुले, नेहाल भुरे, सुरेश शेंडे, संजय बांते, अजीज शेख, नितीन नागदेवे, सुरेश कढव, ईश्वर माटे, प्रवीण भोंदे, दिवाकर मने, संजय वाघमारे, शिंगनजुडे, गणेश गायधने, भारत मते उपस्थित होते.