सनफ्लॅग कंपनीत पहाटे भीषण स्फोट, 3 कामगार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2024 10:22 AM2024-01-02T10:22:30+5:302024-01-02T10:22:57+5:30
परिसर हादरला; सात ते आठ कामगार किरकोळ जखमी
तथागत मेश्राम, लोकमत न्यूज नेटवर्क, वरठी (भंडारा) : सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे ३.१५ वाजता भीषण स्फोट झाला. यात ३ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेत ७ - ८ कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
सदर घटना कंपनीतील एसएमएस या विभागातील एल एच एफ युनिट मध्ये झाली. घटनेचे मूळ कारण अजून गुलदस्त्यात असून हिटिंग फरनेसमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाली. या भागात कार्यरत ३ कामगार काही प्रमाणात भाजल्या गेले व काही कामगारांना किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
गंभीर जखमींची प्रकृती धोक्याबाहेर
अधिक प्रमाणात जखमी झालेल्यांमध्ये टेक्निसीयन नामदेव झंझाड, अभियंता सागर गभने व कंत्राटी कामगार हटवार यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.
स्फोटाने परिसर हादरला
स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेला परिसर हादरला होता. या दुर्घटनेत कंपनीतील साहित्याचे आणि मशिनरीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
व्यवस्थापनाकडून परिसर सील
अपघातात या घटनेनंतर काही वेळातच व्यवस्थापनाने हा संपूर्ण परिसर सील केला. आत प्रवेश करण्यास मज्जाव केला जात असून गेटवरूनच सर्वांना परत पाठविले जात आहे. त्यामुळे आत नेमके काय घडले, आणि काय परिस्थिती आहे, याची कल्पना सध्या तरी बाहेर कोणालाही नाही.