चार दिवसानंतर नोंदविले बयाण
By Admin | Published: June 21, 2017 12:25 AM2017-06-21T00:25:10+5:302017-06-21T00:25:10+5:30
कर्जबाजारीमुळे आत्मदहन केलेल्या जांभोरा येथील ताराचंद्र शेंदरे यांच्या मृत्यूला चार दिवस लोटल्यानंतर करडी पोलिसांनी मंगळवारला त्यांचा मुलगा मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविले.
लोकमतचा दणका : जांभोरा येथील शेतकरी आत्मदहन प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कर्जबाजारीमुळे आत्मदहन केलेल्या जांभोरा येथील ताराचंद्र शेंदरे यांच्या मृत्यूला चार दिवस लोटल्यानंतर करडी पोलिसांनी मंगळवारला त्यांचा मुलगा मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविले. लोकमतने सातत्याने सदर प्रकरण उचलून शेतकरी आत्महत्या लपविण्याचा हा प्रकार असल्याचे दाखवून दिले.
माहितीनुसार, आज करडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे, बिट अमलदार आसाराम नंदेश्वर हे जांभोरा येथे मुलचंद शेंदरे यांच्या घरी त्यांचे बयाण नोंदविण्यासाठी गेले. यात त्यांनी मुलचंद यांनी सांगितलेल्या घटनाक्रमाची माहिती नोंद करून घेतली. १६ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास एलकाझरी शेतशिवारात ताराचंद शेंदरे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. प्राथमिक तपासाअंती ताराचंद शेंदरे यांनी तणसीच्या ढिगाऱ्यावर स्वत:ला कर्जबाजारीपणाच्या चिंतेतून जाळून घेतले होते .यावेळी घटनास्थळावर चपला, पाण्याची बॉटल, कानखोरना आदी साहित्य एका बाजूला आढळून आले होते. मात्र पोलीस ठाण्यात धुऱ्यावर लागलेल्या आगीमुळे ताराचंद शेंदरे यांचा मृत्यू झाला, अशी नोंद त्यावेळी करण्यात आली होती. मात्र मुलचंद शेंदरे यांनी तसा बयाण दिले नसल्याची बाब उघडकीस आल्यानंतर लोकमतने सदर प्रकरण उचलून धरले.
या प्रकरणाची राज्य पातळीवर दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी जांभोऱ्यात जाऊन शेंदरे कुटुंबियांचीही भेट घेतली. दरम्यान आज शासनातर्फे जिल्हाधिकारी दिवसे यांनी तुमसरचे उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले व भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या नेतृत्वात समिती गठीत करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळण्याच्या हेतूने प्रस्ताव सादर करण्याबाबतचा अहवालासाठी चौकशीचे आदेश दिले.
उत्तरीय तपासणीचा अहवाल, पोलिसांचा तपास व मृतक ताराचंद शेंदरे यांच्यावरील कर्जाची माहिती तसेच अन्य बाबी विचारात घेऊन याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.
-शिल्पा सोनुले, उपविभागीय अधिकारी तुमसर
मंगळवारला मृतक शेतकरी ताराचंद शेंदरे यांचा मुलगा मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे.
- तुकाराम कोयंडे, पोलीस निरीक्षक करडी.