समाजाच्या गरजेसाठी वसुंधरेची गरज
By admin | Published: July 9, 2017 12:33 AM2017-07-09T00:33:32+5:302017-07-09T00:33:32+5:30
मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण थांबविणे आपल्या हातात आहे. आपल्या गरजेसाठी वसुंधरेची काळजी घेतली पाहिजे.
विविध स्पर्धांचे आयोजन : भारतीय सैनिकांचे भावनिक आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण थांबविणे आपल्या हातात आहे. आपल्या गरजेसाठी वसुंधरेची काळजी घेतली पाहिजे. तापमानात प्रचंड वाढ व पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य येण्याची चिन्ह आहेत. पर्यावरणाच्या संतुलनासाठी झाडे लावली जावी. आम्ही देशाचे संरक्षण करतो, तुम्ही समाजाच्या रक्षणाकरिता वृक्ष लावा अन् त्याचे संवर्धनही करा असे भावनिक आवाहन भारतीय सेनेत जम्मू काश्मिर येथे कार्यरत असलेले सैनिक आशिष वैद्य यांनी केले.
दोन कोटी वृक्ष लागवड सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल मोहगाव / देवी येथे वृक्षारोपण व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी भारतीय सेनेतील बोथली येथील जवान आशिष वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजकुमार बांते होते. अतिथी म्हणून बोथली ग्रा.पं. सरपंच कैलाश तितीरमारे, रोहणाचे उपसरपंच नरेश ईश्वरकर, सामाजिक कार्यकर्ता मनोज ईश्वरकर तसेच शाळेचे सहाय्यक शिक्षक धनराज वैद्य, हंसराज भडके, गजानन वैद्य, शोभा कोचे, मोहन वाघमारे, लिलाधर लेंडे, श्रीहरी पडोळे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी वृक्ष लावा, जगवा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली होती. कार्यक्रमाप्रसंगी नरेश ईश्वरकर यांनी बेटी बचाव प्रमाणे झाडांचे जतन करा. नवीन रोपे लावा असे आवाहन केले. कैलाश तितीरमारे यांनी पर्जन्यमानाची क्षमता वाढविण्यासाठी वृक्ष लावले पाहिजेत असे सांगितले. हंसराज भडके यांनी, पर्यावरणाचा संबंध जगाशी येतो. निसर्गाचे संवर्धन करू तरच आपले संवर्धन होईल असे सांगितले. मनोज ईश्वरकर यांनी मनोगत व्यक्त केले. आठवीच्या विद्यार्थिनी ऋचिका भडके व मयुरी मडामे यांनी वृक्ष लागवडीचे लाभाविषयी मत मांडले.वृक्ष लागवड काळाची गरज या विषयावर भाषण स्पर्धा, चित्रस्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे बक्षिस देण्यात आले. यात प्राजक्ता ठवकर, मृणाली आगाशे, प्रशांत भडके, इम्रान बावणे, निशा बावणे, अस्मिता आंबीलकर, अर्पिता आंबीलकर, मयूरी मडामे, ऋचिता भडके, खुशी वैद्य, धनश्री लांबट, नेहा शेंडे, प्राप्ती बाभरे या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी शाळेच्या परिसरात भारतीय जवान आशिष वैद्य, नरेश ईश्वरकर, कैलाश तितीरमारे, मुख्याध्यापक राजकुमार बांते, शाळेतील शिक्षक, शिक्षिका तसेच हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे संचालन हेमराज राऊत तर आभार प्रदर्शन गजानन वैद्य यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास हरित सेनेच्या पथकाने सहकार्य केले.
दहा वृक्ष लावा, जगवा, एक हजार घ्या
विद्यार्थ्यांनी झाडे लावावीत. लावलेली झाडे जगवावी यासाठी शाळेच्या वतीने एक हजार रुपयाचे पारितोषिक ठेवले आहे. विद्यार्थ्यांनी कुठेही वृक्ष लागवड करावी. ठिकाणाची माहिती द्यावी, शाळेचे शिक्षक व हरित सेनेचे विद्यार्थी तपासणी करतील. उन्हाळ्यापर्यंत लावलेली दहाही झाडे जगली पाहिजेत. लावलेल्या दहा झाडांचे संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यास एक हजार रुपयाचे बक्षिस शाळेतर्फे देण्यात येणारा नाविण्य उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी हाती घेतला आहे.