खरीपासाठी सुलभ पीक कर्ज अभियान
By admin | Published: June 19, 2017 12:37 AM2017-06-19T00:37:36+5:302017-06-19T00:37:36+5:30
खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. पात्र सर्व खातेदार शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी सुलभ पीक कर्ज अभियान राबविला जाणार आहे.
तीन दिवसांत कर्ज : पीक कर्ज शिबिर, स्थावर मालमत्ता तारण
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. पात्र सर्व खातेदार शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी सुलभ पीक कर्ज अभियान राबविला जाणार आहे. यासाठी बँकांमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महसुल प्रशासनाने पुढाकार घेतल्याची माहिती तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पिककर्ज वाटपासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँकामार्फत पात्र शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
त्यासाठी तालुकास्तरावर २१ ते २३ जून या काळात वडेगाव, भीकाखेडा, डोंगरगाव, भोसा, बीड सीतेपार, बोथली, अकोला, चिचोली, धुसाळा, चिचखेडा, काटेबाम्हणी, सालई बुज, बोरगाव, जांभळापाणी, करडी, बोंदरी, देऊळगाव, केसलवाडा, धोप, जांभोरा, खडकी, पालडोंगरी, मोहगाव देवी, सिरसोली, बेटाळा या गावात पीक कर्ज वाटप अभियान अंतर्गत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात १२ ते १४ जुलैपर्यंत त्याच गावात मेळावे घेण्यात येणार आहेत. या शिबिरात बँक आॅफ इंडिया शाखा मोहाडी, आंधळगाव, स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मुंढरी व जांब, अलाहाबाद बँक शाखा पालोरा, वैनगंगा ग्रामीण बँक शाखा मोहाडी व कॅनरा बँक शाखा कोथुर्णा शाखा व्यवस्थापक उपस्थित राहणार आहे. परिपूर्ण कर्ज प्रकरण संबंधित व्यापारी बँकेने शक्यतो त्याच दिवशी मंजूर कराव्या अशा सूचना आहेत. कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त तीन दिवसात शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करावे.बँकेच्या धोरणानुसार एक लाखापेक्षा अधिक रकमेचे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची स्थावर मालमत्ता पीक कर्जासाठी तारण घेणे बँकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
सुलभ पीक कर्ज अभियानासाठी मोहाडी तहसीलमध्ये बैठक पार पडली. एकमेकांच्या समन्वयाने कामकाज करून जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होईल याची काळजी घेण्यात यावी, असे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी सांगितले. पात्र शेतकऱ्यांना मेळाव्यासाठी आणण्याची जबाबदारी गटसचिवांवर सोपविण्यात आली आहे. पीक कर्ज मेळाव्यात येताना शेतकऱ्यांनी दोन फोटो, रेशनकार्ड, लाईट बिल, रहिवासी दाखला यापैकी एक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना यापैकी एक, जमिनीचा ८ अ, ८ अ प्रमाणे सातबारा उतारे, सर्व गटाच्या चतु:सीमा, सोसायटी एनओसी, यासोबतच एक लाख कर्जासाठी कागदपत्रासह फेरफार ६ ड नोंदी, अधिकृत वकिलाकडून सर्च रिपोर्ट, तसेच कर्जदाराप्रमाणेच जामीनदारालाही कर्ज घेण्याचा शेतकऱ्यांएवढेच कागदपत्रे मागविण्यात येणार आहेत. नादेय दाखल्यासाठी सहकारी संस्थेचे सचिव यांनी कारवाई करावी. शिबिरातच तलाठी यांच्याकडून सातबारा उतारे, ६-ड, पॅनलवरील वकील यांच्याकडून मिळणारी सर्च रिपोर्ट आदी बाबी मेळाव्यात उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. शिबिरात किमान ५० शेतकऱ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र वितरीत करावे.
तातडीने कर्ज उपलब्ध करण्याची कारवाई करण्यात यावी. एक लाखांपेक्षा अधिक कर्जदारांना सात दिवसात प्रत्यक्ष कर्ज वितरीत करावे याची काळजी बँकेने घेण्यात यावी. यावेळी उपसहाय्यक निबंधक सहकारी संस्था, बँकेचे शाखा व्यवस्थापक, मंडळ अधिकारी, तलाठी, विविध कार्यकारी संस्थेचे सचिव उपस्थित राहणार आहे.