सुलभ पीक कर्ज अभियान म्हणजे वरातीमागून घोडे
By admin | Published: July 3, 2017 12:45 AM2017-07-03T00:45:51+5:302017-07-03T00:45:51+5:30
तहानला मेल्यावर विहीर खोदायची, असाच प्रकार सुलभ पीक कर्ज अभियानातून दिसून येतो.
२५ शिबिरात ६७ शेतकरी : एकही प्रस्ताव नाही, कार्यक्रम ठरला केवळ फार्स
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तहानला मेल्यावर विहीर खोदायची, असाच प्रकार सुलभ पीक कर्ज अभियानातून दिसून येतो. त्यासाठी दोन महिने उशिरा पीक कर्ज शिबिरे लावण्यात आली. खरीप पिकासाठी शेतकऱ्यांनी आधीच कर्ज घेतले. त्यामुळे जून महिन्यात झालेल्या पीक कर्ज शिबिरात शेतकरी फिरकलेच नाही. त्यामुळे शासनाचे पीक कर्ज अभियान वरातीमागून घोडे अशी अवस्था झाली.
खरीप पिकाच्या हंगामासाठी शेतकरी मार्च अखेर पीक कर्ज फेडतो. एप्रिल महिन्यात शेतकरी नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी सहकारी संस्था, विविध बँका यांच्याकडे प्रस्ताव दाखल करतो. पहिल्या, दुसऱ्या जून महिन्याच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या हातात नवीन पीक कर्जाचा रुपया हातात पडतो.
त्यानंतर शेतकरी बि बियाणे व इतर शेतीपयोगी साहित्याची खरेदी करीत असतो. यावर्षी विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १६ जूनपर्यंत ४,९२२ शेतकऱ्यांना २४ कोटी २८ लक्ष रुपये पीक कर्ज देण्यात आले. मागील पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी मार्चमध्ये जुळवाजुळव केली. जूनं फेडल, नवीन कर्ज घेतले अन् शेतकरी खरीपाच्या हंगामाला लागला.
शेतकऱ्यांच्या हातात, आटापिटा करून कर्ज रक्कम पडल्यावर ६ जून रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग या विभागाने सुलभ पिककर्ज अभियान परिपत्रक काढले. त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने १४ जून रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांनी मोहाडीसह सहाही तालुक्यातील तहसीलदारांना पीक कर्ज वाटप शिबिराचे आयोजन करावे अशी सूचना ई मेलद्वारा केली.
जिल्हाधिकारी यांनी २१ ते २३ जून या कालावधीत शिबिराचा कालबद्ध कार्यक्रम आखून दिला. या कार्यक्रमानुसार मोहाडी तालुक्यात वडेगाव, भिकारखेडा, डोंगरगाव, डोंगरगाव, भोसा, बिड सितेपार, बोथली, अकोला, चिचोली, धुसाळा, चिचखेडा, काटेबाम्हणी, सालई बु., बोरगाव, केसलवाडा, जांभळापाणी, करडी, बोंदरी, धोप, देऊळगाव, जांभोरा, खडकी, पालडोंगरी, मोहगाव (देवी), सिरसोली, बेटाळा अशा २५ गावात तहसीलदार मोहाडी यांनी पीक कर्ज शिबिराचे आयोजन केले.
या पैकी अनेक गावात शिबिरच झाली नसल्याचे सांगण्यात आले. ज्या गावी पीक कर्ज शिबिर झाली तिथे केवळ मोजून ६७ शेतकरी उपस्थित झाले होते. मजेशिर बाब अशी, त्या ६७ पैकी एकाही शेतकऱ्यांनी पीक कर्ज शिबिरात एकही प्रस्ताव दाखल केला नाही. माहितीनुसार, उप,सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था त्यांचे प्रतिनिधी, राष्ट्रीयकृत, खासगी बँकेचे शाखा व्यवस्थापक, त्यांचे प्रतिनिधी, संबंधित मंडळ अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी, तलाठी, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव यांनी पीक कर्ज वाटप शिबिराला उपस्थित राहणे अनिवार्य होते.
तथापि पीक कर्ज शिबिरात अनेक प्रतिनिधींनी दांडी मारल्याचे सांगण्यात आले. या कारणामुळेही शिबिरात पीक कर्जासाठी एकाही शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे प्रस्ताव दाखल झाले नाही. कर्ज प्रकरणे शिबिरात दाखल न झाल्याने शिबिराच्या दिवशी पिककर्ज शेतकऱ्यांना देण्यात आली नसल्याची बाब समोर आली. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना किती शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले याचा आकडा तहसील कार्यालयाकडे नाही. शासनाच्या आदेशानुसार दोन टप्प्यात सुलभ पीक कर्ज शिबिर घ्यावे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज प्रकरण जागीच मंजूर करावे अशी सोय केली. मोहाडी तालुक्यात २१, २२ व २३ जून रोजी सुलभ पीक कर्ज अभियान शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरात शासनाच्या सुलभ पीक कर्ज अभियानाची फजीती झाली. आणखी आता पुढील १२, १३ व १४ जुलै रोजी २५ गावात सुलभ पीक कर्ज शिबिर आयोजित केली जाणार आहेत. आता शेतकरी रोवणी करतील की, शिबिरात येतील हे शिबिराच्या दिवशीच दिसून येणार आहे. तथापि पीक कर्ज शिबिराचे आयोजन उशिरा झाल्याने प्रशासनाची चांगलीच फसगत झाली.
सोबतच शासनाने तहान लागल्यानंतर विहिर खोदायची असला प्रकार केल्याने शिबिरात पिककर्ज वाटपाचा लक्षांक पूर्ण करण्यास प्रशासन यंत्रणा अपयशी ठरली आहे.