शारीरिक तंदुरुस्तीसाठी पौष्टिक अन्नाचे सेवन आणि व्यायाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 06:00 AM2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:42+5:30
भंडारा तालुक्यातील दवडीपार (बेला) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच दिनेश बांते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश राखडे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सध्याच्या युगात पौष्टिक अन्न, हिरव्या पालेभाज्या, फळे खाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती ही कमी झालेली आहे. जंक फूड खाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कर्करोग हा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. पण शारीरिक तंदुरुस्तीसाठी उपयोगी असणारे पौष्टिक अन्नाचे सेवन आणि व्यायाम केला तर आपली प्रतिकार शक्ती वाढून ती आपणाला कर्करोगापासून दूर ठेवते, असे प्रतिपादन सलाम मुंबई फाऊंडेशनचे जिल्हा सभासद किशोर ठवकर यांनी केले.
भंडारा तालुक्यातील दवडीपार (बेला) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच दिनेश बांते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश राखडे होते.
सर्वप्रथम तंबाखूमुक्तीचा संदेश देण्यासाठी ढोलताशाच्या गजरात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. तंबाखूची नशा-जीवनाची दुर्दशा, तंबाखू मतलब खल्लास या सारख्या घोषणा देत विद्यार्थी रस्त्याने जात होते. प्रभातफेरी शाळेत आल्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरवर्षी सुमारे सात लाख लोकांना कर्करोगाची लागण होते. त्यामध्ये सुमारे चार लाख लोक तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण असतात. तंबाखू सेवनाने सुमारे दोन हजार बळी पडतात. सुमारे दोन लाख महिलांना स्तन कर्करोगाची लागण झाली आहे. सुमारे तीन लाख महिलांना गर्भाशय कर्करोगाची लागण झाली आहे. त्यामुळे तंबाखु सेवणानेच कर्करोग होऊ शकतो, असे नाही तर आपले सदोष खानपान सुद्धा कर्करोगाला निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे सावध होऊन प्रत्येकाने कर्करोगाशी लढले पाहिजे, असे आवाहन आपल्या प्रस्ताविकामधून मुख्याध्यापक दशरथ जिभकाटे यांनी केले. सुरवातीला पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. नेहा राखडे, समीक्षा राखडे, प्रिया बांते, सानिया बांते या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मानवी शरीरात कारसिनोजीन नावाचा घटक असतो. तो काही लोकांमध्ये सक्रीय तर काही लोकांमध्ये तो निष्क्रिय असतो. हा घटक सक्रीय असणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. हा घटक सक्रिय असणाºया लोकांनी तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होतो. शरीरात आतडे, तोंड, जीभ, ओठ, घसा, स्वरयंत्र अशा कर्करोग होण्याच्या जागा आहेत. पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाला सामोरे जावे लागते, असे प्रतिपादन सहायक शिक्षक कैलास बुद्धे यांनी केले. यावेळी अरविंद बारई, दिनेश बांते यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये कैलास बुद्धे यांनी तंबाखूमुक्तीची शपथ दिली. आयुष्यभर तंबाखू पासून लांब राहण्याचा सल्ला दिला. शालेय विद्यार्थ्यांनी तंबाखूचे दुष्परिणाम या पोस्टर्स स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच व्यसनमुक्ती संदेश देणारे नाटक सादर करण्यात आले. स्पर्धांमध्ये सहभागीविद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
शालेय आवारामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची प्रतीकात्मक होळीचे दहन करण्यात आले. होळीला तंबाखूच्या पुड्याचे आणि घोषणांचे तोरण गुंफण्यात आले. खाली फुलांची रांगोळी काढण्यात आली. संचालन कैलास बुद्धे यांनी केले तर आभार अरविंद बारई यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दशरथ जिभकाटे, कैलास बुद्धे, अरविंद बारई, सुनंदा सावरबांधे, कल्पना रामटेके, नंदू बनसोड, मीना सेलोकर यांनी सहकार्य केले.