शहरात धूर फवारणीला ‘खाे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:52+5:302021-09-11T04:36:52+5:30
भंडारा : जिल्ह्यासह भंडारा शहरात कीटकजन्य आजाराला खतपाणी मिळत आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया व अन्य विषाणूजन्य तापाचे रुग्णसंख्या सातत्याने ...
भंडारा : जिल्ह्यासह भंडारा शहरात कीटकजन्य आजाराला खतपाणी मिळत आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया व अन्य विषाणूजन्य तापाचे रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. डेंग्यूने गत आठवड्याभरात दाेन जणांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. मात्र, भंडारा शहरात साधी धूर फवारणीही करण्यात आलेली नाही. नगरपालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देईल काय? असा सवाल नागरिक करत आहेत.
मध्यंतरीच्या काळात पावसाने मारलेली दडी व वातावरणात निर्माण झालेला प्रचंड उकाडा यामुळे कीटकजन्य आजार वाढले. या आजाराने थैमान घातले असतानाच ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढले आहेत. डेंग्यूचे जवळपास ३६ तर मलेरियाचे ४ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रुग्णांनी हाऊसफुल दिसून येत आहेत. ताप, सर्दी, खाेकला, शाैच व अन्य आजारांची लक्षणे असलेली रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. डासांची संख्याही वाढत असताना जिल्ह्यात धूरफवारणीच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. त्याला काही ठिकाणी अपवादही आहे. शासन एकीकडे जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक व सतर्क करत आहे. मात्र, दिव्याखाली अंधार या उक्तीचा परिचयही स्वत: शासन देत आहे.
भंडारा शहरातही धूरफवारणी करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांसह अन्य नागरिकांनी केली आहे. जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजाराने डाेके वर काढले आहे. गत आठवड्याभरापासून पाऊस बरसत असल्याने ताप आलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याला कारणीभूत असलेल्या डासांचे समूळ उच्चाटन हाेणे गरजेचे असताना त्या दिशेने पावले उचलल्याचे दिसून येत नाही.
भंडारा शहराची लाेकसंख्या पावणे दाेन लाखांच्या घरात आहे. अशा स्थितीत नाल्याची अवस्था चांगली नाही. विशेषत: सखल भागांत पाणी शिरते. अनेक दिवस पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती हाेत असते. अशा स्थितीत धूरफवारणी व कीटकजन्य आजारावर नियंत्रणासाठी कारवाई हाेणे अपेक्षित हाेते.
सामाजिक संघटना सरसावली
भंडारा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थेची अवस्थाही हवी तितकी चांगली नाही. भंडारा शहरात डासांची संख्या सातत्याने वाढत असल्याने तसेच विषाणूजन्य तापाची साथ पसरल्याने यावर प्रतिबंधात्मक उपाययाेजना करणे गरजेचे आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शहरात फाॅगिंग करावी, अशी मागणी जाॅय ऑफ गिव्हींगचे नितीन दुरगकर, डाॅ. नितीन तुरस्कर व अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.