ग्रीनफ्रेंड्सतर्फे पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:23+5:302021-09-11T04:36:23+5:30
*विद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली गणेश मूर्ती* *निर्माल्य संकलन केंद्र व कृत्रिम विसर्जन कुंड सुद्धा तयार केले* विद्यार्थ्यांनी तयार केली ...
*विद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली गणेश मूर्ती*
*निर्माल्य संकलन केंद्र व कृत्रिम विसर्जन कुंड सुद्धा तयार केले*
विद्यार्थ्यांनी तयार केली इकोफ्रेंडली गणेशमूर्ती
१० लोक १० के
लाखनी : ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे यावर्षी सुद्धा पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक मातीच्या व शाडूच्या गणेशमूर्तीचा प्रचार व्हावा, याकरिता पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आली. या उपक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्य लाभले.
सहभागी विद्यार्थ्यांनी मातीचा व साध्या जलरंगाचा वापर करीत आकर्षक पर्यावरण देखावा आणि संदेशात्मक घोषवाक्ये लिहून छोटी सुबक गणेशमूर्ती स्वकल्पनेने साकारली. यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने, ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कसा साजरा करावा, त्याचप्रमाणे निर्माल्य संकलनापासून निर्माल्य खत कसे तयार करावे आणि ऑइल पेंट व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे, निर्माल्य तलावात फेकण्यामुळे तलाव, नदी, नाले, विहिरी यांचे होणारे जलप्रदूषण यावर विस्तृत माहिती दिली. ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे निर्माल्य संकलन केंद्र व कृत्रिम विसर्जन कुंड मागील १२ वर्षांप्रमाणे उभारले जाते, याबद्दल माहिती दिली. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांनी घरच्या घरी किंवा कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन ग्रीनफ्रेंड्सतर्फे करण्यात आले आहे.
‘‘पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवा’’ स्पर्धेचे परीक्षण यावेळी करण्यात आले. राणी लक्ष्मी कन्या विद्यालयातून प्रथम क्रमांक मनस्वी बाळकृष्ण गभने हिला तर द्वितीय क्रमांक गायत्री रमेश वैद्य व सुहानी राजेंद्र पाखमोडे यांना प्राप्त झाला. सिद्धार्थ विद्यालय सावरीमधून ओमकार मंगल चाचेरे याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला तर जि. प. गांधी विद्यालय लाखनीमधून प्रथम क्रमांक मंथन घनश्याम चाचेरे व श्रीनय मंगल चाचेरे यांना प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक रेहान घनश्याम चाचेरे याला प्राप्त झाला. एमडीएन फ्युचर स्कूलमधून प्रथम क्रमांक अर्णव अशोक गायधने तर संताजी प्राथमिक शाळेमधून अमित महेश आगलावे व आराध्या महेश आगलावे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. गणेशमूर्तीचे परीक्षण ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य व प्रा. अर्चना गायधने यांनी केले. कार्यक्रमासाठी निसर्गमित्र पंकज भिवगडे, विवेक बावनकुळे, सलाम बेग मिर्झा, योगेश वंजारी, नितीन निर्वाण, दिनकर कालेजवार, मारोतराव कावळे यांनी सहकार्य केले.
100921\img-20210910-wa0161.jpg
photo