खिळेमुक्त झाडांसाठी सरसावले पर्यावरणप्रेमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:30 PM2018-06-18T23:30:04+5:302018-06-18T23:30:25+5:30
शहरात आधीच विनापरवानगीने फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिग्ज लावण्यात येत आहे. त्यातच झाडांवर खिळे ठोकून हे फ्लेक्स, बॅनर्स लावून झाडांना विद्रुप करण्यात येत आहे. परिणामी आॅक्सिजनच्या प्रमाणात होत असलेली घट, झाडांचे घटत चाललेले आयुर्मान हे त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. वृक्ष संवर्धनात आणि पर्यावरण संतुलनात हा प्रकार बाधा आणत आहे. यासाठी झाडांना खिळेमुक्त करण्याची गरज लक्षात घेऊन खिळेमुक्त झाडं हे अभियान भंडारा शहरात राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरात आधीच विनापरवानगीने फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिग्ज लावण्यात येत आहे. त्यातच झाडांवर खिळे ठोकून हे फ्लेक्स, बॅनर्स लावून झाडांना विद्रुप करण्यात येत आहे. परिणामी आॅक्सिजनच्या प्रमाणात होत असलेली घट, झाडांचे घटत चाललेले आयुर्मान हे त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. वृक्ष संवर्धनात आणि पर्यावरण संतुलनात हा प्रकार बाधा आणत आहे. यासाठी झाडांना खिळेमुक्त करण्याची गरज लक्षात घेऊन खिळेमुक्त झाडं हे अभियान भंडारा शहरात राबविण्यात येत आहे.
भंडारा शहरामध्ये त्रिमूर्ती चौक ते वस्तू व सेवाकर कार्यालयासमोर असलेल्या १० झाडांचे १५० च्यावर खिळे राजेश राऊत यांच्यासह सामाजिक संस्थांनी शहरातील झाडे खिळेमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी राऊत म्हणाले, भंडारा शहराला विदर्भातील स्वच्छ आणि खिळेमुक्त झाडांचे शहर म्हणून ओळख द्यायची आहे. जाधवराव साठवणे म्हणाले, सामान्य जनतेने घेतलेल्या या पुढाकाराने भंडारा शहरातील सर्व झाडे खिळेमुक्त, फ्लेक्समुक्त आणि जाहीरातीमुक्त होतील. यावेळी जिजामाता महिला खिळेमुक्त झाड बटालियनच्या पदाधिकारी मंगला डहाके म्हणाल्या, झाडांनाही माणसांसारख्या भावना, वेदना आणि दुख: असतात. झाडांना जगविण्यासाठी सर्वांनी एकत्रित धडपड करणे गरजेचे आहे. या उपक्रमात आशिष भुरे, नेमाजी कारकाडे, हेमंत धुमनखेडे, झेड. आय. डहाके, रमेश माकडे, मुकेश थोटे, गौरव गुप्ता, विशाल तायडे, आनंद दोनाडकर, अमोल ठाकरे, घरोट, माला बगमारे, मंदा चेटुले, पुनम डहाके उपस्थित होते. या उपक्रमात महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय होता. आजच्या सुजाण नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ‘झाडे स्वच्छ तर शहर स्वच्छ’ हे पाहावयास मिळणार असे चित्र निर्माण करण्याचा ध्यास या संस्थांनी घेतला आहे.
या अभियानात महाराष्ट्र विक्रीकर संघटना, युवा जनकल्याण संघटना, भंडारा जिल्हा सेवानिवृत्त महसूल अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ, कनाद बहुद्देशीय शिक्षण संस्था, महालक्ष्मी डिजीटल बॅनर्स, कुणबी महासंघ व भारतीय विद्युत कामगार सहकारी संस्था भंडारा आदी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.