दूध उत्पादनातून साधली आर्थिक समृद्धी; धोप येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 05:36 PM2023-02-25T17:36:17+5:302023-02-25T17:37:43+5:30
सपाटे यांनी मनरेगाच्या योजनेतून जनावरांच्या गोठ्याचे बांधकाम केले
भंडारा : मनात जिद्द व शासकीय योजनेचा लाभ वेळेवर मिळाला तर एखाद्या कुटुंबात कशी समृद्धी नांदू शकते याचे ज्वलंत उदाहरण मोहाडी तालुक्यातील धोप येथे बघायला मिळाले. येथील अल्पभूधारक शेतकरी शिवपाल झिबल सपाटे यांनी मनरेगाच्या योजनेतून जनावरांच्या गोठ्याचे बांधकाम केले. यात त्यांनी गाई पाळल्या. यात मिळालेल्या दूध उत्पादनातून त्यांनी आपली कुटुंब समृद्धी घडवून आणली.
शिवपाल सपाटे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. शेतात धान पीक घेत होते. त्यामध्ये कुठलाही नफा मिळत नव्हता. त्यांच्यापोटी तीन मुली आहेत. त्यांचे शिक्षण व लग्नकार्य करण्याचा प्रश्न सपाटे यांच्यापुढे होता. शेतीच्या भरवशावर त्यांचे लग्न करू शकत नव्हतो. त्याकरिता मला शेती विकणे हाच एकच पर्याय उरला होता. त्यांच्याकडे २०१३-१४ या वर्षात तीन गाई होत्या. मिळणाऱ्या दुधापासून ७ हजार रुपये महिन्याचे उत्पन्न मिळत होते. या गाईच्या संख्येत वाढ करून दूध उत्पादन घेण्याचा निश्चय केला. तीन गाई घेण्याचे प्रयोजन केले. सहा दुधाळू गाई होत्या; परंतु या गायी घराबाहेर बांधाव्या लागत असे. थंडी, ऊन, वारा, पाऊस व रोगराई यांचा गाईंना सामना करावा लागत असे. त्यामुळे दूध उत्पादनसुद्धा तेवढे होत नव्हते.
यासंदर्भात ग्रामपंचायत येथील ग्राम रोजगार सेवक यांनी जनावरांसाठी गुरांचा गोठा नरेगाच्या माध्यमातून आपणास मिळू शकते, याबाबत माहिती दिली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करीत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. गुरांचा गोठा शेड तयार करण्यास मला गावातील सरपंच, ग्रामसेवक व ग्राम रोजगारसेवक त्यांचे सहकार्य मिळाले. गाईचा गोठा बांधल्यानंतर थंडी, ऊन, वारा, पाऊस व रोगराई यांच्यापासून गायींची मुक्तता झाली. यातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या तिन्ही मुलींचे शिक्षण व लग्नकार्य केले.
नरेगा योजनेतून गुरांचा गोठा मिळाला नसता तर मी आपली वडिलोपार्जित जमीन विकून माझ्या तीन मुलींचे लग्नकार्य मला करावे लागले असते. दूध उत्पादनातून समृद्धी कशी आणता येईल हे कळले. दूध उत्पादनाचा मार्ग, शेळी व्यवसाय किंवा कुक्कुटपालन व्यवसाय युवकांनी करावा व कुटुंब समृद्ध करावे.
- शिवपाल सपाटे, धोप, ता. मोहाडी