गोसेखुर्दच्या पाण्यावर इकॉर्नियाचा थर
By admin | Published: November 1, 2016 12:34 AM2016-11-01T00:34:57+5:302016-11-01T00:34:57+5:30
तालुक्यात पर्यटकांसाठी पर्वनी असलेल्या गोसेखुर्द व उमरेड कऱ्हांडला अभयारण्याकडे सुट्यांमध्ये पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.
दूषित पाण्याचा फटका : पर्यटकात नाराजीचा सूर
अशोक पारधी पवनी
तालुक्यात पर्यटकांसाठी पर्वनी असलेल्या गोसेखुर्द व उमरेड कऱ्हांडला अभयारण्याकडे सुट्यांमध्ये पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. गोसेखुर्दच्या काळ्याभोर दिसणाऱ्या पाण्यावर इकॉर्निया वनस्पतीचा थर प्रचंड प्रमाणात वाढल्याने धरणाचे सौंदर्य काहीसे लुप्त होत आहे. त्यामुळे पर्यटकात नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे
पर्यटकांचे आकर्षण ठरलेला जय दिसेनासा झाल्याने पर्यटनासाठी सुरू झालेल्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याकडे सुद्धा पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.
नाग नदीचे दूषित पाण्यामुळे चर्चेत असलेल्या गोसेखुर्द प्रकल्प हल्ली इकॉर्निया वनस्पतीच्या दूरवर पसरलेला थरामुळे पर्यटकांत चर्चा होवू लागली आहे. हिरव्या वनस्पतीच्या थरामुळे प्रकल्पातील पाणीसाठा बऱ्याच अंतरापर्यंत झाकलेला आहे. त्यामुळे काळ्याभोर पाण्यावर हवेच्या वाहन्यामुळे निर्माण होणारे तरंग व लाटा पर्यटकांना पहायला मिळत नाही. त्यामुळे पर्यटकांत नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामधून जागतिक किर्ती मिळालेला जय नावाचा वाघ दिसेनासा झाला तेव्हापासून अभयारण्याच्या पवनी गेटवर पर्यटक फिरकताना दिसत नाही. व्यवसाय मिळावा या हेतूने बेरोजगार युवकांनी जिप्सी खरेदी केलेल्या आहेत. परंतु पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरविल्यामुळे विभागाचे तर नुकसान होणारच परंतु बेरोजगार युवकांना फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. गोसेखुर्द मधील इकॉर्निया निर्मूलन करण्यासाठी सिंचन विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.