पर्यावरणाविषयी मानवाला योग्य पद्धतीने शिक्षित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:58 AM2019-02-22T00:58:43+5:302019-02-22T00:59:05+5:30
जपानमध्ये स्वच्छता व पर्यावरणाला महत्व आहे. तेथील प्रत्येक नागरिक पर्यावरणासाठी जागरुक आहे. शालेय आणि विद्यापीठस्तरावर शिक्षण दिले जाते. मात्र भारतात पर्यावरणाच्या योजना कागदावरच राहतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जपानमध्ये स्वच्छता व पर्यावरणाला महत्व आहे. तेथील प्रत्येक नागरिक पर्यावरणासाठी जागरुक आहे. शालेय आणि विद्यापीठस्तरावर शिक्षण दिले जाते. मात्र भारतात पर्यावरणाच्या योजना कागदावरच राहतात. भारतात पर्यावरणाविषयी मानवाला योग्य पद्धतीने शिक्षित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जपानच्या नागो विद्यापीठाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ.मिकी ईनोकी यांनी केले.
भंडारा तालुक्यातील बेला येथील महेंद्र महाविद्यालयात ‘भारत आणि दक्षिण आशियात पर्यावरणाची समस्या’ या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी अमृत बन्सोड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिग्मे सुल्ट्रीन, नागपुरचे संदेश मेश्राम उपस्थित होते. डॉ.इनोकी म्हणाल्या, पर्यावरणाच्या संतुलनाकरिता जपान इतर देशांना आर्थिक मदत करते. भारतानेही पर्यावरणासाठी पुढाकार घेऊन नागरिकांना शिक्षित करावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना सुल्ट्रीन म्हणाले, जगातील सर्वात उंच तिबेटच्या पठारातील भारत, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम, लाओस, कंबोडियाच्या दिशेने सिंधू, सतलज, ब्रम्हपुत्रा, येस्लो, यांगसी, साल्वी, मेकाँग इत्यादी नद्या वाहतात. परंतु तिबेटमधील संरक्षीत जंगलात अंधाधुंद कटाई चालू असून त्यामुळे पर्यावरणाचा तोल जात आहे. त्याचा परिणाम दक्षिण आशियातील नागरिकांवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
संचालन प्रा.मोरेश्वर गेडाम, प्रास्ताविक प्राचार्य अर्जुन गोडबोले तर आभार प्रा.शुभांगी बन्सोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.गडकरी, प्रा.मेश्राम, प्रा.ढोक, प्रा.खोब्रागडे, प्रा.शहारे, निंबार्ते, मते, गजभिये, कांबळे यांनी सहकार्य केले.