जिल्ह्यात दीड वर्षात १२०४ प्रकरणात आरोपींना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:48 AM2018-08-19T00:48:02+5:302018-08-19T00:49:22+5:30
दीड वर्षात जिल्ह्यातील १२०४ प्रकरणात विविध आरोपींना येथील न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायप्रविष्ठ सहा हजार ६९४ प्रकरणे निकाली निघाली असून यातील पाच हजार २९० प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यात ११ प्रकरणात तर विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत १३ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दीड वर्षात जिल्ह्यातील १२०४ प्रकरणात विविध आरोपींना येथील न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायप्रविष्ठ सहा हजार ६९४ प्रकरणे निकाली निघाली असून यातील पाच हजार २९० प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यात ११ प्रकरणात तर विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत १३ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनी योग्यरीत्या गुन्हाच्या तपास केल्याने दीड वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपींना शिक्षा झाली.
भंडारा जिल्ह्यात २०१७ साली तीन हजार ४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातील विविध गुन्ह्यात ६९८ प्रकरणात शिक्षा झाली. तर तीन हजार ३५२ प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आले. शिक्षेचे प्रमाण १८.३७ टक्के आहे. यावर्षी खूनाच्या १३ प्रकरणाची चार जणांना शिक्षा ठोठावण्यात आली तर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या नऊ पैकी चार जणांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या चौदा प्रकरणात एका जणाला शिक्षा झाली असून १३ प्रकरणात आरोपी निर्दोष मुक्त झाले आहे.
विनयभंग आणि पास्को कायद्यांतर्गत नऊ प्रकरणात आठ जणांना शिक्षा तर विनयभंग व अॅक्ट्रासिटी अंतर्गत एक, अॅट्रासिटी दोन, बलात्कार सहा, वीज कायद्यांतर्गत दोन आरोपींना शिक्षा ठोठावली. एक ते पाच गुन्ह्यातील एक हजार २ प्रकरणे निकाली काढली. त्यापैकी १३८ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली तर ८६४ प्रकरणे निकाली निघाली.
जानेवारी ते ३१ जुलै २०१८ या काळात दोन हजार ४४ प्रकरणे न्यायालयाने निकाली काढली. त्यापैकी ५०६ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली तर २१३८ प्रकरणे निर्दोष मुक्त करण्यात आली. या कालावधीत खुनाचा १७ खटल्यात सात प्रकरणात शिक्षा, खुनाचा प्रयत्न या खटल्यात दोन, विनयभंग- पास्को पाच, बलात्कार चार, वीज कायदा एक आणि एनडीपीएस कायदांतर्गत एका प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली. एक ते पाच अंतर्गत एक हजार १०४ प्रकरणापैकी ३६० प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली तर ७४४ प्रकरणे निर्दोष निकाली काढण्यात आली. पोलिसांनी योग्यरित्या तपास करुन न्यायालयात सक्षम बाजू मांडल्याने शिक्षेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षा झाल्याने गुन्हेगारावर वचक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
दारूबंदी जुगारात शिक्षेचे प्रमाण केवळ १८ टक्के
जिल्ह्यात दीड वर्षात जुगार, दारुबंदी व इतर गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण १८ टक्क्याच्या वर असल्याचे दिसून येते. २०१७ साली जुगार कायद्यांतर्गत ३३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातील १२४ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली. दारुबंदीच्या २०९४ प्रकरणांपैकी १६ प्रकरणात शिक्षा झाली तर इतर गुन्ह्यात ५०६ प्रकरणांपैकी ४२० प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली. जानेवारी ते ३१ जुलै या सहा महिन्याचा कालावधीत जुगारांतर्गत २२४ प्रकरणापैकी ८१ प्रकरणात तर दारुबंदीच्या १ हजार १८७ प्रकरणांपैकी सात प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली. इतर गुन्ह्याच्या १२९ प्रकरणांपैकी ५८ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्ह्यात दारूबंदी आणि जुगाराच्या प्रकरणात शिक्षेचे प्रमाण अत्यल्प दिसून येते. अनेक प्रकरणात केवळ केसेस करावयाच्या असल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचे बोलले जाते. दारू आणि जुगाराच्या प्रकरणात पोलिसांनी नरमाईची भूमीकात घेतली नाही ना, असे बोलले जात आहे.
केवळ १६ प्रकरणात शिक्षा
जिल्ह्यात दीड वर्षात दारूबंदीच्या विविध प्रकरणात शिक्षेचे प्रमाण अत्यल्प दिसून येते. २०१७ साली दोन हजार ९४ प्रकरणांपैकी केवळ १६ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली तर दोन हजार ७८ प्रकरणे निर्दोष मुक्त झाले. जानेवारी ते जुलै २०१८ या कालावधीत दारुबंदीच्या १ हजार १८७ प्रकरणा पैकी सात प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्ह्यात दारुबंदी कायद्यांन्वये पोलिसांनी प्रकरणे दाखल केली. मात्र यात निर्दोष मुक्त होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.