‘लेटलतीफ’ १० कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2017 12:14 AM2017-02-02T00:14:31+5:302017-02-02T00:14:31+5:30
जिल्हा परिषद प्रशासनात अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याची बाब नेहमीचा चर्चेचा विषय आहे.
शिक्षण विभागातील प्रकार : कारवाईच्या भीतीने कर्मचारी धास्तावले
भंडारा : जिल्हा परिषद प्रशासनात अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याची बाब नेहमीचा चर्चेचा विषय आहे. वचक नसल्याने कर्मचारी कर्तव्यावर वेळेवर पोहचत नाही. मात्र शिक्षण विभागातील ‘लेटलतीफ’ दहा कर्मचाऱ्यांना नव्यानेच रुजू झालेले शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांनी नोटीस बजावले आहे. यामुळे शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद इमारतीतून शिक्षण विभागाचा कारभार चालतो. मागील काही वर्षांपासून येथे नियमित शिक्षणाधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांचे फावत आहे. नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने शिक्षण विभाग चर्चेत राहत आहे. नियमित शिक्षणाधिकारी नसल्याने प्रभारींवर येथील प्राथमिक शिक्षण विभागाचा कार्यभार सुरु होता. मात्र येथे नियमित शिक्षणाधिकारी म्हणून शासनाने रविकांत देशपांडे यांना भंडारा येथे पाठविले आहे.
देशपांडे हे २७ जानेवारी भंडारा येथे रुजू झाले. सोमवारला त्यांनी सकाळी कार्यालय गाठले. दिवसभर त्यांनी कार्यालयीन कामाचे अवलोकन केले व अधिनस्थ कर्मचाऱ्यांची बैठक घेवून त्यांना कामे तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. मंगळवारला देशपांडे हे कार्यालयामध्ये सकाळी ९.४५ वाजताच दाखल झाले. शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची वेळ ही १० वाजताची आहे. मात्र शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी हे वेळ चुकूनही उपस्थित झाले नाही. त्यामुळे देशपांडे यांनी येथील ‘लेटलतीफ’ महिला अधिक्षकासह दहा कर्मचाऱ्यांना तातडीने उशिरा येण्याचे कारण दाखवा नोटीस बजावले. यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली.
दरम्यान दहाही लेटलतीफ कर्मचाऱ्यांनी नोटीस मिळताच ताबडतोब त्याचे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. आज बुधवारला शिक्षण विभागातील नेहमीचेच ‘लेटलतीफ’ कर्मचारी कालच्या नोटीस मुळे आज वेळेवर कार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्यालयात हजर झाले. नव्याने रुजू झालेल्या शिक्षणाधिकाऱ्यानी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्याने ही शिस्त सदोदित रहावी अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)
शासन नियमानुसार व चाकोरीत राहून सर्व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यपालन करावे. कार्यालयात येण्याची वेळ ठरवून दिलेली आहे. मात्र याला फाटा देत अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याने कामाचा खोळंबा होतो. यामुळे उशिरा आलेल्या दहा कर्मचाऱ्यांना पत्र देऊन त्याचे स्पष्टीकरण मागितले.
- रविकांत देशपांडे, शिक्षणाधिकारी, (प्राथ.) भंडारा.