शिक्षण सेवा संवर्गाची परीक्षा अखेर स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 02:15 PM2019-03-28T14:15:16+5:302019-03-28T14:17:02+5:30
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्याता पदाची विभागीय परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्याता पदाची विभागीय परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. लोकसभा निवडणूक काळात आयोजित या परीक्षेसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. आता निवडणूक कामात व्यस्त परीक्षार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शिक्षण सेवा ( शिक्षण सक्षमीकरण) या संवर्गातील प्राचार्य (गट-अ), ज्येष्ठ अधिव्याख्याता (गट-अ) आणि अधिव्याख्याता (गट-ब) या पदांसाठी विभागीय परीक्षा मुंबई येथे ३० व ३१ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यासंबंधीचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्गमित केले होते. या परीक्षेसाठी राज्यातील ३२४ प्राचार्य आणि अधिव्याख्याता पात्र ठरले होते. त्यापैकी अनेकांची लोकसभा निवडणूक कामासाठी नियुक्ती झाली आहे. झोनल ऑफिसर तथा मतदान केंद्राध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक प्रशिक्षण आणि विभागीय परीक्षेचा ताण अश्या अवस्थेत पात्र प्राचार्य आणि अधिव्याख्याते सापडले होते. त्यातच मार्च एंडिगमुळे आर्थिक लेखाजोखाचे कामही त्यांच्यापुढे आहे. अश्या परिस्थितीत परीक्षा द्यायची कशी, असा प्रश्न सर्वांना पडला होता.
या परीक्षेसंदर्भात ‘लोकमत’ने २६ मार्च रोजी ‘निवडणूक काळात शिक्षण सेवा संवर्गातील प्राचार्य व अधिव्याख्यातांची परीक्षा’ असे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत राज्य लोकसेवा आयोगाने ही परीक्षा आता स्थगित करण्याचा निर्णय घेताला आहे. तसेच पत्र आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यात सदर परीक्षा आयोजित करताना येणाऱ्या संभाव्य प्रशासकीय अडचणींचा विचार करता विभागीय परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे. तसचे या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद आहे.