जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांचे विद्यार्जन
By admin | Published: July 7, 2017 12:50 AM2017-07-07T00:50:02+5:302017-07-07T00:50:02+5:30
पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पालोरा चौरास येथे ११५ वर्षे जुनी जिल्हा परिषद शाळेची इमारत
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे लक्ष केव्हा जाणार ?
लोकमत न्यूज नेटवर्क
पालोरा : पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पालोरा चौरास येथे ११५ वर्षे जुनी जिल्हा परिषद शाळेची इमारत आहे. शाळेची ही इमारत जीर्ण झाली असून ठिकठिकाणी कवेलू फुटलेले आहेत. येथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कवेलू फुटलेले असल्यामुळे पावसाळ्यात पाणी गळत असते. भिंती, लाकडी फाटे जीर्ण झाले आहे. जीव धोक्यात घालून येथे विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत. जिल्हा परिषदेने लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
पवनी तालुक्यातील पालोरा हे गाव दोन हजार लोकवस्तीचे आहे. प्रत्येक शाळा ही पुर्णपणे सुरक्षीत, प्रसन्न वातावरण मुलभूत सुविधा असावी, असा आदेश शासनाने काढला आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक शाळामध्ये सुविधांचा अभाव पाहायला मिळत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा हा एक पुरावाच म्हणावा लागेल. १० ते १४ गाव मिळून येथे ही एकच शाळा होती.
शाळेची इमारत इंग्रजी कौलारू आहे. अनेक ठिकाणाहून कौलारू फुटल्यामुळे आतमधून आभाळाचे दर्शन करायला मिळते. भिंतीला तडे गेले आहेत. लाकडी फाटे कुजलेले आहेत. अशा धोकादायक जीर्ण व आयुष्य संपलेल्या इमारतीत अनेक विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. गावातील प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी व पुढारी वर्ग गावाच्या विकासाचे कार्य दुरच राहिले मात्र पैसा मला कुठून मिळणार याकडेच जास्त लक्ष असते. शाळेला नवीन इमारत मिळविण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
पहिली ते चवथीपर्यंत जीर्ण इमारतीमध्ये विद्यार्थी शिकत आहेत तर गावातच चवथी ते सातवीपर्यंत पक्की इमारत बांधण्यात आली आहे. ही इमारत नाल्याला लागून असल्यामुळे विद्यार्थी दुर्गंधीच्या वासात ज्ञानअर्जना करीत आहेत. नाकाला रूमाल बांधून विद्यार्थ्यांना बसावे लागते. शाळेची पाहणी करण्याकरीता अनेकदा अधिकारी येताना दिसतात मात्र कागदोपत्री घोडे नाचवून काम पूर्ण करीत असल्याचे आजवर दिसून आले आहे.