शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
By admin | Published: December 20, 2014 10:33 PM2014-12-20T22:33:29+5:302014-12-20T22:33:29+5:30
प्रत्येक विद्यार्थ्यांला शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र हे करत असताना प्रत्येक शाळेत शिक्षकांची पदे
साकोली : प्रत्येक विद्यार्थ्यांला शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र हे करत असताना प्रत्येक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत, याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. साकोली तालुक्यात एका मुख्याध्यापकासह १२ शिक्षक कमी आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाला कसरत करावी लागत आहे.
पंचायत समिती साकोली अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागामार्फत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेचा कारभार चालतो. तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ९६ व हायस्कुलच्या तीन शाळा आहेत. यात वर्ग १ ते ५ मध्ये ८ हजार ६८५ विद्यार्थी तर वर्ग ६ ते ८ मध्ये ६ हजार १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
यासाठी शासनाने पदवीधर शिक्षकांची तालुक्यासाठी ६२ पदे मंजूर केली. यापैकी ५४ पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. तर ८ पदवीधर शिक्षक कमी आहेत.
सहाय्यक शिक्षकांची २७८ पदे मंजूर असून सध्या तालुक्यात २७४ शिक्षक कार्यरत आहेत. तर चार सहाय्यक शिक्षक कमी आहेत. उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे १९ पदे मंजूर असून सध्या १८ कार्यरत आहेत. त्यापैकी एक मुख्याध्यापक कमी आहे. असे १३ शिक्षक साकोली तालुक्यात कमी आहेत. यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी वारंवार शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. मात्र शिक्षकांची रिक्त पदांची पूर्तता झालेली नाही.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून वर्षाला हजारोंचा खर्च करण्यात येतो. यात विद्यार्थ्याना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, मध्यान्ह भोजन यासारख्या सोयी पुरविल्या. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, कामचुकारपणा, नियोजनाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांवर संकट ओढावत आहे. साकोली तालुक्यातील वांगी, बोंडे व वडद या शाळेत शिक्षकांच्या मागणीसाठी चारवेळा शाळा बंद आंदोलन केले. त्यानंतर शिक्षण विभागाने तात्पुरती सोय म्हणून दुसऱ्या शाळेतील शिक्षकांना पाठवून केली. (तालुका प्रतिनिधी)