लघु सिंचन योजनेच्या प्रगणना कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:31+5:302021-02-26T04:49:31+5:30
भंडारा : केंद्र सरकारकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची प्रगणना आणि वॉटर बॉडीजची प्रगणना करण्यात येत आहे. प्रगणनेच्या कार्यक्रमासाठी प्रगणकांच्या नेमणुका ...
भंडारा : केंद्र सरकारकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची प्रगणना आणि वॉटर बॉडीजची प्रगणना करण्यात येत आहे. प्रगणनेच्या कार्यक्रमासाठी प्रगणकांच्या नेमणुका करा, या प्रगणना कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित सिंचन प्रगणना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी ए. आर. जगताप, जि. प. जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. सी. कापगते, गोसेखुर्द उपसा सिंचन विभाग आंबाडीचे कार्यकारी अभियंता अ. वि. फरकडे यांची उपस्थिती होती.
सिंचन प्रगणना योजनेमध्ये साध्या विहिरी, उथळ, मध्यम व खोल कूपनलिका आणि दोन हजार हेक्टर सिंचन क्षमतेच्या लघु सिंचन योजना, धरण, कालवे, बंधारे, विमोचक, बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे केले जाणारे प्रवाही सिंचन आणि नदी, नाले, बंधारे, जलाशय इत्यादीवरील उपसा सिंचन योजना तसेच नागरी आणि ग्रामीण भागातील जलसाठे (वॉटर बॉडीज) व दोन हजार हेक्टर वरील सिंचन क्षमतेचे मोठे, मध्यम प्रकल्प, उपसा सिंचन योजना, कृषी व मृदसंधारण विभागाकडील सिमेंट बंधारे, शेततळे, सिंचन विहिरी व भूजल सर्वेक्षण यंत्रणेसंबंधित कूपनलिका याची प्रगणना करण्यात येणार आहे.