यांत्रिकी पद्धतीने शेती करा- धावटे
By admin | Published: June 19, 2017 12:41 AM2017-06-19T00:41:39+5:302017-06-19T00:41:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या शेतीच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना तंत्रशुध्द माहिती व्हावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या शेतीच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना तंत्रशुध्द माहिती व्हावी. पारंपारिक शेतीला बगल देत यांत्रिकी पध्दतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करुन शेतीची उत्पादकता कमी खर्चामध्ये काढावी, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजय धावटे यांनी शेतकऱ्यांना केले.
करचखेडा येथे आयोजित ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी’ पंधरवाड्याचा समारोप समारंभात अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिध्दार्थ लोखंडे होते. त्यांनी उत्पादकता वाढवायची असेल तर शेतीचे योग्य नियोजन व जमिन, हवामान व उपलब्ध पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची निवड करावी. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि गटशेतीच्या माध्यमातून एकत्र येवून उत्पादन आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा ताळमेळ बसवून शेती करायला हवी, असे प्रतिपादन केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या माध्यमातुन शेतकरी गटाने एकत्र येवून शेतीला पुरक जोडधंदा कुकुट पालन मधुमक्षीकापालन, दुग्धव्यवसाय व गटांचा सहाय्याने शेती करावी, असे मार्गदर्शन विजय घावटे यांनी केले.
यावेळी मान्यवरांनी ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी’ पंधरवाड्याचा उद्देश शेतकऱ्यांना तंत्रशुध्द माहिती व्हावी. पारंपारिक शेतीला बगल देत यांत्रिकी पध्दतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करुन शेतीची उत्पादकता कमी खर्चामध्ये काढावी असल्याचे सांगण्यात आले. यावेळीसरपंच संदीप केवट, ग्रामपंचायत पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषी अधिकारी बी. डी. बावणकर यांनी केले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी एस. जी. गणविर, आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक होमराज धांडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक डोरलीकर, कृषी सहायक गिरीश रणदिवे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतिश वैरागडे क्षेत्रीय कृषी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.