मर रोगाने वांग्यांची रोपे नष्ट होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:21+5:302021-09-05T04:39:21+5:30
सिहोरा परिसरात असणाऱ्या वैनगंगा नदीकाठच्या शेजारी असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेत आहेत. परसवाडा गावाच्या शेतशिवारात १० हेक्टर ...
सिहोरा परिसरात असणाऱ्या वैनगंगा नदीकाठच्या शेजारी असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेत आहेत. परसवाडा गावाच्या शेतशिवारात १० हेक्टर शेतात गावातील शेतकरी नितीन पांडे, लखन मोरे, संदीप मोरे, नितीन मोरे, पराग मोरे, दिनकर येवले, संदीप विठुले, नरेश नंदूरकर यांनी वांग्याचे उत्पादन घेण्यासाठी रोपे लावली आहेत. एक ते दीड फुटापर्यंत रोपांची वाढ झाली आहे. या रोपावर मर रोगाने आक्रमण केले आहे. वांग्याच्या रोपांची वाढ थांबली आहे. या शिवाय वांग्याची रोपे मृत होत असल्याने शेतकऱ्यांनी अनेक औषधांची फवारणी केली आहे. कृषी केंद्र संचालकांचे मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या सल्ल्याने उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु सकारात्मक परिणाम दिसून आले नाहीत. यात औषध फवारणीसाठी लागणारे आर्थिक चटके शेतकऱ्यांना बसले आहेत. आधीच हवालदिल असणाऱ्या शेतकऱ्यांवर मर रोगाने संकट आणले आहे. भाजीपाला उत्पादनातून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे. १३ किमी अंतरावर तिरोडा शहरातील बाजारपेठ या शेतकऱ्यांना प्राप्त होत असल्याने भाजीपाला उत्पादनाकडे शेतकरी वळले आहेत,परंतु मर रोगाने वांगी उत्पादकाचे होत्याचे नव्हते झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी मर रोगाची कैफियत कृषी अधिकाऱ्यांना सांगितली असता साकोली पंचायत समितीचे कीटक तज्ज्ञ डॉ. वजीरे यांनी शेतकऱ्यांच्या शेत शिवारात वांगी उत्पादनाची पाहणी केली. यावेळी सिहोऱ्याचे मंडळ कृषी अधिकारी अजय बागडे, कृषी पर्यवेक्षक के. टी. पारधी, कृषी सहायक एच. एन. पढारे उपस्थित होते. डॉ. वजीरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत उपाययोजना सांगितल्या आहेत. दरम्यान, रेंगेपार, पांजरा, तामसवाडी गावांच्या शेत शिवारात वांगी उत्पादनावर मर रोगाने आक्रमण केले असल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.