लॉकडाऊनमध्ये साकोलीत रोहयोची कामे जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:01:02+5:30
लॉकडाऊनमुळे जवाळपास चाळीस दिवस मजुरांना घरीच बसून राहावे लागले होते. मात्र त्यानंतर शासनाने मजुरांना गावी पाठविण्याची सोय केली. त्यामुळे कामासाठी बाहेर राज्यात गेलेले मजूर आपल्या राज्यात परत आले आहेत. सध्या या मजुरांना काम नाही. त्यामुळे या मजुरांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने जास्तीत जास्त रोहयोची कामे सुरु करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनामुळे बाहेर गावूह परत आलेल्या मजुरांची संख्या अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा मजुरांचा आकडा अधिकच आहे. सध्या साकोली तालुक्यात २३ हजार ११७ रोजगार हमीच्या कामावर असून कोरोनाच्या सावटातही मजुरांची मजुरीसाठी धडपड सुरु आहे.
लॉकडाऊनमुळे जवाळपास चाळीस दिवस मजुरांना घरीच बसून राहावे लागले होते. मात्र त्यानंतर शासनाने मजुरांना गावी पाठविण्याची सोय केली. त्यामुळे कामासाठी बाहेर राज्यात गेलेले मजूर आपल्या राज्यात परत आले आहेत. सध्या या मजुरांना काम नाही. त्यामुळे या मजुरांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने जास्तीत जास्त रोहयोची कामे सुरु करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रोजगार हमीची कामे सुरु झाली असून मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. साकोली तालुक्यात पारंपारिक शेती व्यवसाय व शेतीच्या कामाव्यतिरिक्त इतर रोजगाराच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे साकोली तालुक्यातील बहुतांश मजुरांचे दरवर्षीच परराज्यात, परजिल्ह्यात कामाच्या शोधासाठी जात होते. त्यामुळे रोजगार हमीच्या कामासाठी मजूर पाहिजे तेवढे मिळत नव्हते. त्यामुळे कामासाठी मजुरांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र यावर्षीची परिस्थिती जरा वेगळीच आहे.
कोरोना रोगाच्या भीतीमुळे परराज्यात, परजिल्ह्यात कामासाठी गेलेल्या मजुरांनी आपल्या घराचा रस्ता पकडला व गावी परत आले. मात्र गावात आल्यावर आता त्यांना रोजगार नाही. त्यामुळे त्यांना आता रोजगार हमीच्या कामाचा आधार मिळाला आहे. या कामामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी रोजगार हमीच्या कामावरील मजुरांची संख्या ही अधिकच आहे.
त्या मजुरांनाही मिळणार रोजगाराची संधी
लॉकडाऊन काळात परप्रांतातून किंवा परजिल्ह्यातून स्वगावी परतलेल्या मजुरांनाही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर कामधंदे उपलब्ध नसल्याने परत आले आहेत. अशा मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध होऊ शकतात. काहींनी याचा लाभही घेण्यास सुरुवात केली आहे. नोंदणी करून खात्यातच मजुरीची रक्कम जमा होत असल्याने आर्थिक चणचणही दूर होणार आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती अंतर्गत ४०४ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहेत. भंडारा तालुक्यातील ५५, लाखांदूर ४४, लाखनी ६२, मोहाडी ६१, पवनी ६३, साकोली ५० व तुमसर तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींनी रोहयोची कामे सुरु केली आहेत.